सिंधुदुर्गात शिवसेनेची पिछेहाट, नितेश राणे म्हणाले…

पोलिसनामा ऑनलाईन टीम – शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या अन्य ग्रामपंचायतीही हिसकावून घेण्यात राणे समर्थकांना यश आले आहे. सिंधुदुर्गातील जवळपास ९० टक्के ग्रामपंचायतींवर आता भाजपाचीच निर्विवाद सत्ता आलेली आहे. या विजयावर आमदार नितेश राणे यांनी, आम्हाला धक्का देणार अजून जन्माला आला नसल्याचा, इशारा शिवसेनेला दिला आहे.

सावंतवाडी तालुक्यातील दांडेली ग्रामपंचायत शिवसेनेकडून हिसकावून घेण्यात भाजपला यश आहे. दांडेली या गावात भाजपचे नेते तथा आमदार आशिष शेलार यांची सासूरवाडी असून दांडेली ग्रामपंचायत बरीच वर्षे शिवसेनेकडे होती मात्र यावेळी ती ग्रामपंचायत भाजपकडे आली आहे.भाजप नेते आशिष शेलार स्वता या ठिकाणी प्रचारासाठी आले होते.त्यामुळेच या ग्रामपंचायत वर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते.

देवगड तालुक्यात २३ पैकी १८, वैभववाडी १२ पैकी ९ ग्रामपंचायतींवर भाजपची सत्ता आली आहे. शिवसेनेकडे असलेल्या तोंडवली-बावशी, कुपवड़े, चिंदर, कोलगाव भाजपने मिळविल्या आहेत. तर सावंतवाडी तालुक्यातील तळवडे ग्रामपंचायत दहा वर्षेनंतर भाजपकडून हिसकावून घेण्यात शिवसेनेला यश आले आहे माजी राज्यमंत्री आमदार दीपक केसरकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रतिष्ठेची मानली जाणारी सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव ग्रामपंचायत भाजपने शिवसेनेकडून हिसकावून घेत माजी राज्यमंत्री आमदार दीपक केसरकर यांना जोरदार धक्का दिला आहे. जिल्ह्य़ातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून कोलगाव कडे पाहिले जात होते. भाजप चे जिल्हा चिटणीस महेश सारंग यांनी एकहाती वर्चस्व राखले आहे. जिल्ह्य़ात कोलगाव प्रमाणेच तळवडे ग्रामपंचायत महत्वाची मानली जात होती.पण ही सत्ता खेचून आणण्यात शिवसेनेला यश आले असून शिवसेना आठ तर भाजपला पाच जागावर यश मिळाले आहे.