Bihar Assembly Election 2020 : शिवसेनेचे नवे चिन्ह ‘तुतारीधारी मावळा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेनं 50 उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे. निवडणुक आयोगाने शिवसेनेला बिहार निवडणुकीसाठी आधी बिस्कीट हे चिन्ह दिले होते. त्यावर शिवसेनेच्या बिहार शाखेने नाराजी व विरोध दर्शवून ते चिन्ह बदलण्याची मागणी केली होती.

धनुष्यबाण हे शिवसेनेचे देशभरात ओळखले जाणारे चिन्ह असल्याचे सेना नेत्यांचे म्हणणे होते. मात्र सत्तारूढ जदयूने त्याला विरोध केला होता. या चिन्हामुळे बिहारमधील मतदार संभ्रमित होतील, त्यांची दिशाभूल होईल व त्याचा परिणाम मतदानावर पडेल, असा दावा जदयूतर्फे करण्यात आला होता.

आता शिवसेनेला “तुतारीधारी मावळा’ हे नवे चिन्ह देण्यात आले आहे. मात्र धनुष्यबाण हे पारंपारिक चिन्ह देण्याच्या सेनेच्या मागणीला आयोगाने आपला नकार कायम ठेवला आहे. आयोगाला शिवसेनेने तुतारीधारी मावळा, धनुष्यबाण, ट्रॅक्‍टरवर बसलेला शेतकरी, बॅट, गॅस सिलेंडर या चिन्हांचे पर्याय दिले होते.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातही शिवसेनेने बिहारमध्ये निवडणूक लढवली तेव्हा त्यांच्या सगळ्या उमेदवार अमानत रक्कम जप्त झाली होती. तेव्हा शिवसेना रिकाम्या हाताने मुंबईला परतली होती. बिहारमध्ये निवडणुका लढविण्यावर भाजपने शिवसेनेवर टीका केली आहे. भाजपचे पक्षनेते आर. के. सिन्हा यांनी, बिहारमध्ये कोणती शिवसेना निवडणूक लढवणार आहे ? स्वर्गीय बाळासाहेबांची की सोनिया गांधींच्या इशाऱ्यावर काम करणारी शिवसेना? अशी टीका केली आहे.