शेठ काय हे ! हा महाराष्ट्र आहे, पुन्हा पाय घसरला तर मोडून पडाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला दिलेल्या ऑफर बाबत खुलासा केला. त्यानंतर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे.

प्रचारादरम्यान अमित शहा यांनी शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं ? असा सवाल विचारला होता मात्र निवडणुकीनंतर अचानक शरद पवारांच्या अनुभवाची गरज भाजपला का पडू लागली त्यांचा कोणत्या अनुभवाचा फायदा नेमका मोदींना अपेक्षित होता ? अशा प्रकारचे अनेक प्रश्न दैनिक सामनातून उपस्थित केले गेले आहेत.

सध्या पवार यांच्या अनुभवाचा मोरंबा महाराष्ट्र चाखत असून, दिल्लीश्वरांना मात्र तो चाखता आला नाही. एवढेच काय पण अजित पवारांचा पापडही भाजपला भाजता आला नाही असा टोला लागावत शेठ काय हे ! हा महाराष्ट्र आहे, पुन्हा पाय घसरला तर मोडून पडाल अश्या प्रकारचा इशारा देण्यात आला आहे.

केवळ आणि केवळ शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हे सर्व दिग्दर्शन सुरु असल्याचे सांगत शरद पवार यांनी मात्र हे सर्व नाट्य आता समोर आणले आहे. त्यामुळे सामनातून भाजपवर टीकास्त्र सोडण्यात आले आहे. पवारांनी मात्र भाजपची ऑफर धुडकावून लावली भाजपने मात्र शिवसेनेशी नाते तोडायचे असेच ठरवल्याचे देखील सामनातून म्हंटले आहे.

भाजपच्या हिंदुत्वावर टीका –

भारतीय जनता पक्षाचे हिंदुत्व हे कुचकामाचे हिंदुत्व आहे. शिवसेनेला वाकवायचे, वाकले नाही तर दूर ढकलायचे हे धोरण आधीच ठरले होते. शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे नाट्य तयारच होते, असे सांगत त्यासाठी शरद पवार यांच्या अनुभवाचा फायदा देशाला करून घेणाऱ्यांना ही उपरती आधी का झाली नाही, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.

साम, दाम, दंड भेदाच्या पलीकडे काहीतरी सुरु आहे आणि त्याचा स्फोट शरद पवार यांनी केला तसाच तो उद्योजक राहुल बजाज यांनी देखील केला. राहुल बजाज यांनी तुमच्या राज्यात मोकळेपणाने बोलण्याचे आणि भयमुक्त पणे जगण्याचे स्वातंत्र्य राहिलेले नाही असे राहुल बजाज यांनी देशाच्या गृहमंत्र्यांना तोंडावर सांगितल्याने सामनातून याचे कौतुक करण्यात आले आहे.

शरद पवार यांनी दबाव झुगारला तर राहुल बजाज यांनी भय व झुंडीचे शास्त्र सांगितले आणि ही सर्व हिमतीची कामे महाराष्ट्रात झाली असे म्हणत अग्रलेखातून मराठी बाण्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

आणखी काय काय म्हंटल आहे अग्रलेखात

– शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ द्यायचा नाही हा त्यांचा ‘कावा’ होता.
– राज्यात शिवरायांच्या विचारांचे राज्य येऊ नये हे त्यांचे ध्येय होते.
– असे अनुभव पुढेही येतील, दिल्लीने सवय ठेवली पाहिजे.
– मर्जीतले उद्योगपती आणि दलालांसाठी महाराष्ट्राला चरकात टाकून पिळण्याचे काम सुरू होते… हे पिळणे उद्धव ठाकरे यांनी थांबवले.

Visit : policenama.com