‘विदेशी षडयंत्रात शिवसेनेचे हस्तक, ‘टुलकीट’ प्रकरणात जिल्हा प्रमुखाचाच भाऊ आरोपी’; आ. राम कदमांचा हल्लाबोल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप नेते आणि आमदार राम कदम यांनी ट्विट करून आणि एक व्हिडिओ शेअर करत शिवसेनेवर टोकाचे बाण चालवले आहेत. भारत मातेला बदनाम करू पाहणाऱ्या विदेशींच्या षडयंत्रामध्ये शिवसेनेतील काही हस्तक सामिल असल्याचा थेट आरोप आमदार कदम यांनी केला आहे. कदम यांनी टुलकीट प्रकरणी आरोपी असलेला शंतनू मुळूक हा बीडमधील शिवसेना नेत्याचा भाऊ असल्याचे म्हटले आहे. तसेच, सत्तेच्या सिंहासनासाठी शिवसेना खालच्या स्तराला गेली आहे. आता स्वर्गीय बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही. हिंदुत्व आणि देशहिताच्या गोष्टी करणारी शिवसेना खालच्या स्तराला गेल्याचे कदम यांनी म्हटले आहे.

दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, दिशा रवी, निकिता जेकब आणि शंतनू या तिघांनी ‘टूलकिट’ तयार केले. तसेच ते खलिस्तानच्या समर्थकांशी थेट संपर्कात होते. निकिता जेकबने दाखल केलेल्या या याचिकेवरील सुनावणी न्या. प्रकाश नाईक यांच्या एक सदस्यीय खंडपीठापुढे होती. जेकबने चार आठवड्यांचा ट्रान्झिट जामीन देण्याची विनंती न्यायालयाला केली आहे. आपल्यावर नोंदविण्यात आलेला गुन्हा खोटा असल्याचे जेकबने याचिकेत म्हटले आहे. न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी मंगळवारी ठेवली आहे.

शंतनूचा शोधासाठी दिल्ली पोलीस दोन दिवस बीडमध्ये तळ ठोकून होते. मात्र, शंतनू सापडला नसल्याने त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. बीडमधील संशयित शंतनूचे जागतिक पातळीवर पर्यावरणासंदर्भात काम आहे. या तरुणासह इतर चार अशा पाच लोकांचा ग्रुप असल्याचे सांगण्यात येते. याच ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी शेतकरी आंदोलनाला सुरुवातीपासूनच पाठिंबा दर्शविल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान राम कदम यांनी भारतरत्न पुरस्काराने सन्मानित गानकोकीळा लता मंगेशकर आणि भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, तसेच अभिनेता अक्षयकुमार, सुनील शेट्टी यांच्या ट्विटची चौकशी रद्द करण्याची मागणी केली आहे.