‘सामना’त नाणार प्रकल्पाची जाहिरात ! कोकणात प्रकल्प राबवणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नाणारमधील रिफायनरी विरोधात सातत्यानं आक्रमक होणाऱ्या शिवसेनेनं त्यांची भूमिका बदलली की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना शिवसेनेनं नाणारविरोधात आक्रमक भूमिका घेत प्रकल्पाला विरोध दर्शवला होता. मात्र, आता सत्तेत येताच शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या पहिल्या पानावर नाणारची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे शिवसेनेनं यू-टर्न घेतल्याची चर्चा कोकणात सुरु झाली आहे.

सामनाच्या कोकण आवृत्तीच्या पहिल्याच पानावर ही जाहिरात आल्याने कोकणात नाणार प्रकल्प राबविला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून त्यामुळे कोकणवासियांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना आणि भाजपसोबत सत्तेत असतानाही शिवसेनेने कोकणात राबविला जाणाऱ्या नाणार प्रकल्पाला तीव्र विरोध केला होता. मात्र, सामनाच्या पहिल्या पानावर नाणारची जाहिरात छापण्यात आल्याने शिवसेनेनं नाणारवरून आपली भूमिका बदलल्याचे बोललं जात आहे.

सामानामध्ये छापण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये नाणार प्रकल्पामुळे कोकणाचा विकास होऊन कसा फायदा होणार हे सांगण्यात आले आहे. कोकणात निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधी आणि शैक्षणिक सुविधांबाबत या जाहिरातीत भाष्य करण्यात आले आहे. हा प्रकल्प उभारल्यानंतर कोकणातील दीड लाख लोकांना रोजगार मिळणार असून वीस हजार लोकांना थेट रोजगार मिळणार असल्याचे जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे. ‘रत्नागिरी रिफायनरीचे प्रत्येक पाऊल, कोकणवासियांच्या उन्नतीसाठीच…’ अशी टॅगलाइन जाहिरातीला देण्यात आली आहे. या जाहिरातीबाबत शिवसेना काय भूमिका मांडते याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.