राज ठाकरेंच्या कुटुंबियांवर पहिल्यांदाच शिवसेनेने केली जाहीर टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मनसेच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईतील एमआयजी क्लबमध्ये आज बैठक सुरू आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पुत्र अमित ठाकरे यांच्यासह मनसेचे अनेक महत्वाचे नेते देखील या बैठकीसाठी उपस्थित आहे. राज ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली काही दिवसांपूर्वी मनसेची एक महत्वाची बैठक पार पडली होती. परंतु या बैठकीत राज ठाकरे यांची सून आणि अमित ठाकरे यांनी पत्नी मिताली ठाकरे देखील उपस्थित राहिल्याने याची सर्वत्र चर्चा रंगली होती. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी मनसेवर खोचक टीका केली आहे.

वरुण सरदेसाई यांनी मनसेवर शॅडोचे पण माझे कुटुंब – माझी जबाबदारी, असे ट्विट करत खोचक टीका केल्यामुळे आगामी काळात शिवसेना आणि मनसे यांच्यातील वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ठाकरे कुटुंबियांवर आतापर्यंत वैयक्तिक टीका टाळणाऱ्या शिवसेनने पहिल्यांदाच राज ठाकरेंच्या कुटुंबाबाबत जाहीर टीका केल्याने मनसे यावर काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तर आज सकाळपासूनच शिवसेनेचे युवा सेनेचे सचिव वरुण देसाई यांनी मनसेवर टीका करणाऱ्या ट्विटची मालिका सुरू केली आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेचा उल्लेख वीरप्पन गँग असा केला, त्यावर वरुण सरदेसाई यांनी पलटवार करत मनसे खंडणीखोर असल्याची टीका केली. वरुण सरदेसाई यांच्या या टीकेला पुन्हा संदीप देशपांडे यांनी प्रत्युत्तर दिलं. मी वीरप्पनबद्दल बोललो, तर वरुण देसाईला का झोंबलं, माहिती नाही, अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिली.