काय सांगता ! होय, स्वप्नात डोनाल्ड ट्रम्प आल्यानं ‘कृष्णा’नं मंदिरच बांधलं, आता करतोय 6 फुट मूर्तीची ‘पुजा’

हैद्राबाद : वृत्तसंस्था – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे २४ आणि २५ फेब्रुवारीला भारत दौऱ्यावर आहेत. सर्वत्र सध्या ट्रम्प यांच्या नावाचीच चर्चा सुरु आहे. ते या दौऱ्यात मोदींच्या अहमदाबाद शहराला सुद्धा भेट देणार आहेत. ही चर्चा सुरू असतानाच तेलंगणातील एका ‘ट्रम्प भक्ताची कहाणी’ आता समोर आली आहे. या भक्ताने ट्रम्प यांचे एक मंदिर बांधले असून त्यात त्याने ६ फूट उंचीच्या मूर्तीची स्थापन केली आहे. तो व्यक्ती रोज त्या मूर्तीची पूजा करतो आणि ट्रम्प हे माझे दैवत आहे असे सांगत असतो.

ही गोष्ट आहे तेलंगणातील कोन्ने गावातील बुसा कृष्णाची. तो एक रियल इस्टेट एजंट आहे. तो आता ट्रम्प भक्तीमुळे त्याच्या परिसरात प्रसिद्ध झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष होण्याआधी व्यावसायिक होते आणि त्यांची रिअल इस्टेट मध्ये त्यांची मोठीच उलाढाल आहे.

तू ट्रम्प यांचा भक्त कसा झालास ? हे कृष्णाला विचारताच त्याने एक मजेशीर उत्तर दिले. तो म्हणाला की, ट्रम्प माझ्या स्वप्नात आले होते आणि मग त्यांच्या प्रेमातच पडलो आणि मी माझ्या घराच्या अंगणातच त्यांचे मंदिर बांधले व सहा फुटांचा पुतळा बसवला आहे. तो सकाळ – संध्याकाळ त्यांची पूजा करतो व दुग्धाभिषेक सुद्धा करतो असे कृष्णाने सांगितले.

या गोष्टीला कृष्णाच्या घरातील नातेवाईकांनी विरोध केला आहे. पण तो सध्या कुणाचेच ऐकत नाही, तुम्ही जसे शिवाची आणि इतर देवांची पूजा करता तसेच ट्रम्प हे माझ्यासाठी माझे देव असल्याचे त्याने सांगितले.
डोनाल्ड ट्रम्प येत्या २४ आणि २५ तारखेला भारत भेटीवर येत आहेत तर, कृष्णाला आपल्या दैवताला भेटायचे असून त्यासाठी त्याने केंद्र सरकारकडे परवानगी देखील मागितली आहे.