‘हा’ खेकडा शिवसेना पोखरतोय, वेळीच ‘नांग्या’ मोडा, संतप्त शिवसैनिकांच्या पोस्टरबाजीमुळं प्रचंड ‘खळबळ’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक बड्या नेत्यांना डावलण्यात आले कारण तीन पक्ष मिळून ही सत्ता स्थापित करण्यात आल्याने प्रत्येक पक्षाच्या वाट्याला मंत्रिपद जेमतेमच आली आहेत. अशात काही बड्या नेत्यांना मंत्रिपद मिळाले नाही. या कारणामुळे अनेक नेते नाराज आहेत. यांपैकीच एक नाव म्हणजे शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत होय. तानाजी सावंतांना मंत्रिपद न मिळाल्याने त्यांनी उस्मानाबाद जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाला थेट मदत केली आहे. आणि त्यांच्या या मदतीमुळे उस्मानाबाद जिल्हा परिषदेवर भाजपाचा झेंडा फडकला आहे. या निवडणुकीत अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या भाजप समर्थक सदस्या अस्मिता कांबळे यांची तर उपाध्यक्षपदी सेनेच्या बंडखोर गटाचे धनंजय सावंत यांची वर्णी लागली. यामुळे शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

शिवसैनिकांनी सोलापूरमध्ये बॅनर लावून हा खेकडा शिवसेना पोखरत असून याच्या वेळीच नांग्या मोडायला हव्यात अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. हे बॅनर सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे बॅनर सोलापूर शहरातील मेकॅनिक चौकात लावण्यात आले आहे. यामध्ये तानाजी सावंत यांचा फोटो खेकड्याच्या चित्रावर लावलेला आहे.

tanaji sawant

जेव्हा भाजपाच्या काळात तानाजी सावंत हे मंत्री होते तेव्हा त्यांनी एक वादग्रस्त विधान केले होते. या विधानाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर होत होती. त्यावेळी कोकणातील तिवरे धरण फुटले होते त्यावर उत्तर म्हणून हे धरण खेकड्यांनी पोखरल्यामुळे फुटले असे आश्चर्यचकित विधान त्यांनी केले होते. तेव्हा जोरदार टीकेला देखील त्यांना सामोरे जावे लागले होते. तसेच मी महाराष्ट्राला भिकेला लावेल, पण मी कधीही भिकारी होणार नाही असं वक्तव्यही सावंत यांनी केलं होतं. त्यावरुनही विरोधकांनी मोठी कोंडी केली होती. सावंत नेहमीच अशा वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात.

आमदार तानाजी सावंत यांनी मंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेतली होती आणि मंत्रिपद न मिळाल्याचे कारणही विचारले होते. परंतु त्यांना ठाकरेंकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांच्यात खटके उडाले आणि यापुढे मी मंत्रिपदासाठी मातोश्रीवर कधीही येणार नाही असे ते म्हटले होते. सावंतांचा हा तोरा पाहून उद्धव ठाकरेंनी त्यांना ठाकरे शैलीत ‘जय महाराष्ट्र’ म्हणत निरोप दिला होता.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/