PM नरेंद्र मोदींनी मराठीत ‘ट्विट’ करत छत्रपती शिवाजी महाराजांना केले ‘अभिवादन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. याच निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मराठीतून ट्विट करत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. त्यांनी ट्विट केले की, भारत मातेचे महान सुपूत्र, महान प्रशासक, धैर्य आणि शौर्याचे प्रतिक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन सर्वांनाच प्रेरणादायी आहे.

आज नवी दिल्लीत महाराष्ट्र सदनात शिवजंयती धुमधडाक्यात साजरी करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराजांची वैश्विक जयंती आज राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात बारा देशांचे राजदूत सहभागी झाले होते. या राजदूतांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल गौरव उद्गार काढले.

बल्गेरियाच्या राजदूत इलेन वोरा यांचे चक्क मराठीतील भाषण ऐकून सर्वांच्या भुवया उंचावल्या. शिवजयंतीनिमित्त महाराष्ट्र सदनात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण महाराष्ट्र सदन फुलांनी सजवण्यात आले होते.

यावेळी नाशिक ढोल पथक आणि लेझीम पथकाने जयंती कार्यक्रमांत रंगत आणली. लष्कराच्या मराठा रेजिमेंटचा बँड महाराष्ट्र सदनात वाजवण्यात आला. शिवजन्माच्या सोहळ्यासाठी शिवाजी महाराजांचा पाळणा देखील सजवण्यात आला होता. खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्या नेतृत्वात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.