मराठा लाइट इन्फंट्रीचा २५० वा स्थापनादिन उत्साहात साजरा

बेळगाव : वृत्तसंस्था – छत्रपती शिवाजी महाराज मराठा इन्फंट्रीचे नायक आहेत. गनिमी काव्याची युध्दनीती मराठा रेंजिमेंट सेंटरने ब्रिटीश काळापासून अवलंबली आहे म्हणून आज देशभरात सेनेमध्ये मराठा दिन उत्साहात साजरा केला जातो, असे विधान ले. जनरल पी.जे. एस. पन्नू यांनी केले. मराठा इन्फंट्रीचा २५० वा स्थापनादिन बेळगाव मुख्यालयात आयोजित करण्यात आला होता. कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती.

मराठा दिनाचे औचित्य साधून लष्करी केंद्रात परेड व सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होत. यावेळी सहा शिस्तबध्द तुकड्यांकडून ले. जन. पी. जे. एस. पन्नू यांनी जवानांकडून मानवंदना स्वीकारली. वायूसेनेचीही एक तुकडी पथसंचलनात सहभागी झाली होती. ले. जन. पन्नू म्हणाले की, कर्तव्य, मान व साहस या तीन तत्वांवर मराठा रेजिमेंटचे जवान सेनेत सेवा बजावतात. छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाचा पगडा सेनेवर आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय ही घोषणा जवानांना प्रेरणा देते.

मराठा लाईट इन्फंट्रीचा इतिहास –

भारतीय लष्करात मराठा लाइट इन्फंट्रीचे एक वेगळे स्थान आहे. या बटालियनने स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंत आपल्या शौर्यशाली आणि देदीप्यमान कामगिरीने इतिहास घडवला आहे. मराठा लाईट इन्फंट्रीची ४ ऑगस्ट १७६८ मध्ये ‘बॉम्बे सिपॉय’ नावाने बटालियनची स्थापना करण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराज हे इन्फंट्रीचे दैवत आहे. बोल श्री शिवाजी महाराज की जय ही युद्धघोषणा आहे.

मराठा बटालियन भारतीय सैन्यातील तिसरी सर्वात जुनी बटालियन आहे. मराठा बटालियनने दुसऱ्या महायुद्धातही आपल्या पराक्रमाची चमक दाखवली. आफ्रिका खंडातील पहाडांपासून ते वाळवंटांपर्यंत सर्व प्रकारच्या युद्धभूमीवर मराठा बटालियनने शौर्य गाजवून सर्व लढाया जिंकल्या. बटालियनने गाजवलेल्या शौर्यामुळे बटालियनला जंगी पलटण या किताबाने गौरवण्यात आले होते.

भारतीय लष्कराच्या पॅराशूट रेजिमेंटमध्येही मराठा रेजिमेंटच्या सैनिकांचा समावेश आहे. सेकंड पॅराच्या तुकडीनेही उत्तम काम केले आहे. सर्जिकल स्ट्राइकसारख्या अत्यंत अभिमानास्पद कारवाईतही मराठाच्या सैनिकांचा समावेश होताच. कर्नल वाय. बी. शिंदे यांनीच पहिली स्पेशल फोर्सेस बटालियन सुरू केली. अलिकडे २००८ साली मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतर हेलिकॉप्टरमधून दोरीने खाली उतरून दहशतवाद्यांवर हल्ला चढविणारी पहिली व्यक्ती ही मराठाचेच कर्नल होते.बटालियनला गेल्या २५० वर्षांमध्ये १५ वेळा युद्धातील कामगिरीसाठी गौरवण्यात आले आहे.