मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘या’ दिवशी साजरी करणार ‘शिवजयंती’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शासकीय शिवजयंती साजरी करणार, मात्र शिवसेना तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करणार, अशी माहिती शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना गेल्या अनेक वर्षापासून आग्रहाने मांडत असलेल्या भूमिकेपासून फारकत घेतली आहे का ? अशी चर्चा आता सुरु झाली आहे. शिवजयंतीच्या मुद्यावरून विरोधक उद्धव ठाकरे व शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न करत असताना शिवसेनेने सुवर्णमध्य काढला आहे.

शिवजयंती एकाच दिवशी साजरी व्हावी यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब  यांनी दिली. राज्य सरकार याबाबत समिती नेमणार असून त्यानंतर शिवजयंती एकाच दिवशी साजरी करण्याबाबत निर्णय होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याचा हट्ट शिवसेना सोडणार का, हे येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होणार आहे.

दरम्यान महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीवरून पुन्हा वाद झाला आहे. येत्या 19 फेब्रुवारील शिवजयंती साजरी करण्याची मागणी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अमोल मिटकरी यांनीही हट्ट सोडा आणि 19 फेब्रुवारीलाच जयंती साजरी करा, असे आवाहन ट्विटच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना केले आहे.