शिवाजी महाराजांनी स्वतःचं घर भरलं नाही, ‘यांची’ संपत्ती कुठून आली असं म्हणत उदयनराजेंनी सोडला ‘बाण’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ”आज के शिवाजी – नरेंद्र माेदी” या पुस्तकावरुन सध्या महाराष्ट्रभर वाद निर्माण झालेला आहे. दरम्यान या पुस्तकांविरोधात अनेक राजकीय नेत्यांनी आपले मत व्यक्त करत भाजपावर जोरदार टीका केली आहे. अशात शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भाेसले याबाबतीत काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.

अखेर उदयनराजेंनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. उदयनराजेंनी शिवाजी महाराजांची तुलना काेणाशीच हाेऊ शकत नाही असे स्पष्ट केले. आणि या पत्रकार परिषदेत त्यांनी महाविकास आघाडीवरही जोरदार टीका केली. उदयनराजे म्हणाले की, लाेकशाहीतील राजाने नेहमी याेग्य वागले पाहिजे. शिवाजी महाराजांनी कधीच आपलं स्वत:चं घर भरलं नाही. यांची संपत्ती कुठून आली, हे गर्भश्रीमंत हाेते का ? असे म्हणत उदयनराजेंनी नाव न घेता शिवसेनेवर म्हणजेच मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका केली.

पुणे येथे ही पत्रकार परिषद घेण्यात आली असून या पत्रकार परिषदेत उदयनराजे भोसले यांनी अनेकांचा समाचार घेतला. महाविकास आघाडीवर टीका करताना ते म्हणाले, जे स्वार्थापोटी एकत्र येतात ते फार काळ एकत्र राहत नाहीत. ज्यावेळी त्यांचा स्वार्थ साध्य होतो त्यावेळी ते आपआपल्या मार्गाने निघून जातात, हे राज्याच्या जनतेला सांगावेसे वाटते. जे लाेक विचारांनी एकत्र ते कायमस्वरुपी एकत्र राहतात. लोकांनी विचाराने एकत्र यावे हेच माझे धोरण आहे. माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर मला माफ करा, आणि मला एक मित्र समजून माझी चूक मला सांगा. स्वातंत्र्य मिळवून आपण काय मिळवलं ? अशी असते का लाेकशाही ? राजेशाही असती तर एकालाही उपाशी ठेवलं नसतं. अशा शब्दात आज उदयनराजेंनी आपले मत स्पष्ट केले.

दरम्यान शिवसेनेवर उदयनराजेंनी जोरदार टीका केली ते म्हणाले, सध्या राज्यात शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहेत आणि लोकांनीच निवडून दिलेले जाणते राजे फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पळवापळवी करत होते. यांनी ”राजा” या नावाचा खेळखंडाेबा केला असून या राजकारणाची किळस वाटते. हे दिवस बघण्यापेक्षा मेलेलं बरं, असं वाटतं. असे उदयनराजेंनी स्पष्ट केले. तसेच त्यांनी सांगितले की शिवसेना ही शिवाजी महाराजांच्या नावावर चालते, पक्षाच्या नावातून महाराजांचं नाव काढून टाका आणि ठाकरे सेना करा. मला बघायचंय तुम्ही नाव बदलल्यावर तुमच्याबरोबर किती लाेक राहतात. ज्या वेळेस तुम्ही महाराजांचं नाव वापरता तेव्हा थाेडीतरी लाज राखा, महाराजांचं नाव घ्यायचे आणि जातीय दंगली घडवून आणायच्या, श्रीकृष्ण आयाेग बघा, ज्या लोकांना दंगलीत जीव गमवावा लागला आहे त्यांच्या कुटुंबावर किती आघात झाला असेल याचा विचार केलात का ? असे अनेक प्रश्न उदयनराजेंनी उपस्थित केले.

तसेच जेवढे इतिहास संशाेधक हाेते त्यांनी अभ्यास करुन १९ फेब्रुवारी हीच महाराजांची खरी जन्म तारीख आहे असे सांगितले आहे. तरी तीन वेगवेगळ्या दिवशी शिवजयंती राज्यात साजरी केली जाते हे चुकीचे असून अजून किती मानहानी करणार महाराजांची ? असा प्रश्न देखील त्यांनी स्पष्ट केला आहे. तसेच ते म्हणाले की राज्यातील जनता मुर्ख नाही. शिवस्मारकाचे काय झाले ? असा देखील सवाल उदयनराजेंनी केला.

फेसबुक पेज लाईक करा –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like