शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्ग भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या ठिकाणी पार्किंग व्यवस्था

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गाचे भूमिपूजन मंगळवारी (दि.१८) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.  श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल महाळुंगे-बालेवाडी येथे संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमासाठी केंद्र आणि राज्यातील अतिमहत्वाच्या व्यक्ती उपस्थित राहणार असल्याने पार्श्वभूमीवर वाहतूक विभागाने पार्किंग व्यवस्थेचे वेगवेगळ्या ठिकाणी नियोजन केले आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे मेट्रोच्या तिस-या मार्गिकेच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल सी. विद्यासागर राव, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय राज्यमंत्री हरदीप सिंह पुरी, पालकमंत्री गिरीश बापट, मंत्री दिलीप कांबळे, विजय शिवतारे, खासदार अनिल शिरोळे आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी येणा-या नागरिकांनी साडेतीन पर्यंत कार्यक्रम स्थळी पोहोचण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

अति महत्वाच्या आणि महत्वाच्या व्यक्तींच्या वाहनांसाठी हॉटेल ऑर्चीड पार्किग मेन गेट मधून प्रवेश देण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी दिलेल्या सूचनेनुसार वाहने पार्क करून चालत कार्यक्रम स्थळी येणार आहेत. नागरिक व कार्यकर्त्यांच्या वाहनांना महाराजा गेट मधून प्रवेश देण्यात आला आहे. कारमधून येणा-या नागरिक व कार्यकर्त्यांना हॉटेल ऑर्चिडच्या मागच्या बाजूला कार पार्किंग मध्ये वाहने पार्क करून चालत कार्यक्रम स्थळी जाता येणार आहे.

जे नागरिक व कार्यकर्ते बस मधून येणार आहेत. त्यांनी महाराजा गेटवर उतरून कार्यक्रमस्थळी जावे. बस चालकांनी नागरिकांना महाराजा गेटवर सोडल्यानंतर सर्व्हिसरोडने सरळ जाऊन सूर्या अंडरपास मधून यु टर्न घ्यावा. तिथून मिटकॉन येथे पार्किगच्या जागेत बस पार्क कराव्यात.जी वाहने ठरवून दिलेल्या ठिकाणी वाहने लावणार नाहीत, अशी वाहने क्रेनने उचलून पार्किंगच्या ठिकाणी लावण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.