पुणे : अर्धनग्न अवस्थेतील फोटो, व्हिडीओ काढून १० हजारांची मागणी करणार्‍याला बेड्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – हेड मसाज करताना गुंगीचे औषध देऊन महिलेचे अर्धनग्न फोटो व व्हिडीओ काढून ते शेजारी व नातेवाईकांना पाठविण्याची धमकी देत तिला १० हजार रुपयांची मागणी करणाऱ्या तरुणाला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे.

संतोष संभाजी केंद्रे (रा. दिघी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. न्यायालयाने त्य़ाला २६ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर याप्रकरणी एका ३७ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. हा प्रकार १६ एप्रिल ते २२ एप्रिल २०१९ दरम्यान घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला गृहिणी आहे. तर संतोष केंद्रे हा शहरात आयुर्वेदिक औषधी प्रॉडक्टसची घरोघरी जाऊन विक्री करतो. त्याने संबंधित महिलेला काही औषधे दिली होती. तर त्यांचे हेड मसाज करून देण्यासाठी तो महिलेच्या घरी आला होता. त्याने महिलेला हेड मसाज करताना स्वर्ण प्राशनचे कसलेतरी औषध दिले. त्या औषधाने महिलेला गुंगी आली. त्यानंतर त्याने महिलेची अर्धनग्न अवस्थेतील फोटो आणि व्हीडीओ काढले. त्यानंतर महिलेला ते फोटो, व्हिडीओ शेजारी आणि नातेवाईकांना पाठवून बदनामी करण्याची धमकी देत १० हजार रुपयांची मागणी केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक शिंदे करत आहेत.