शिवाजीनगर विधानसभा : सध्याची इन्कमिंग मनपा निवडणूकीत डोकेदुखी ठरणार ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपने इन्कमिंग सुरू केल्याने यापूर्वी भाजपमध्ये आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. सध्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही इन्कमिंग होत असली तरी 2022 मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये याचे परिणाम दिसून येणार आहेत. आपला पत्ता कट होणार का या चिंतेने अनेकांना धडकी भरली असून हे इन्कमिंग करणाऱ्यांना धडा शिकवण्याचा चंग विद्यमान नी बांधला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतेच खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे काँग्रेसचे चार नगरसेवक भाजपवासी झाले आहेत. यासोबतच काँग्रेसचे माजी मंत्री चंद्रकांत छाजेड यांचे चिरंजीव आनंद छाजेड यांनीही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. तर एक माजी महापौर प्रवेशाच्या तयारीत आहेत, असे समजते. विशेष असे कि 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीमध्ये मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेस मधून भाजपमध्ये आलेल्यानी महापालिका निवडणुकीमध्ये विजय मिळवला. त्यामुळे कधी नव्हे ते शिवाजीनगर मतदारसंघातून भाजपला मोठे यश प्राप्त झाले आहे. यापैकी बहुतांश मंडळी खासदार संजय काकडे यांचे समर्थक मानले जातात.

खासदार काकडे हे शिवाजीनगर मतदार संघातून इच्छुक होते मात्र पक्षाने माजी खासदार अनिल शिरोळे यांचे चिरंजीव नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे यांना शिवाजीनगर मतदार संघातून उमेदवारी दिली. तर विद्यमान आमदार विजय काळे यांचा पत्ता कापला. आमदार काळे यांच्यावर नाराजी असल्याने त्यांची उमेदवारी कापल्याचे बोलले जात आहे. वास्तविकत: सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी देण्यासाठीच काळे यांची उमेदवारी कापल्याचे एव्हाना स्पष्ट झाले आहे. वाटेतील एकेक अडथळा दूर करत शिरोळे यांनी स्वतःची ताकद निर्माण करण्यासाठी अन्य पक्षातील पदाधिकारी आणि नगरसेवक यांना पक्षात घेण्याचा सपाटा लावला आहे.

वरकरणी हे विधानसभेसाठी शक्तिप्रदर्शन असले तरीही आगामी महापालिका निवडणुकीमध्ये पक्षांतर्गत विरोधकांना नेस्तनाबुत करण्यासाठी दुहेरी चाल असल्याचे बोलले जात आहे. छाजेड यांचा पक्ष प्रवेश हा काकडे समर्थक नगरसेवकांना शह देण्यासाठीच केला गेला असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चिले जाऊ लागले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार दत्तात्रय बहीरट हे गोखलेनगर परिसरातील असले तरी बोपोडी औंध परिसरात त्यांचा मोठा नातेवाईक वर्ग आहे.

हा नातेवाईक वर्ग भाजपमध्ये असल्याने दगाफटका होऊ शकतो हेरूनच नाराज काँग्रेसजनांना आपल्याकडे घेण्यात येत आहे. यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत औंध बोपोडी प्रभागातील तसेच खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड मधील भाजप इच्छुकांचे पत्ते कट झाल्यास नवल वाटायला नको. एकंदरच पक्षांतर्गत राजकारणाचा परिणाम हा 24 तारखेच्या निकालातून पाहायला मिळेल असे भाजप मधील नाराज कडून सांगण्यात येत आहे.

visit : policenama.com