Exit Poll 2019 : शिवाजीराव आढळराव पाटलांचा ‘डेंजर’ झोनमधून ‘सेफ’ झोनमध्ये प्रवेश !

ठिकठिकाणच्या बातमीदारांकडून – पुणे जिल्हयातील शिरूर मतदार संघाची निवडणुक शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची होती. सलग ३ वेळा खासदार म्हणून निवडुन आलेल्या आढळराव पाटील यांच्यासमोर कोणाला रिंगणात उभं करायचं असा प्रश्‍न राष्ट्रवादी काँग्रेसच्या समोर उभा होता. त्यातच राष्ट्रवादीने विलास लांडे यांच्या उमेदवारी पत्‍ता कट करून अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांना शिरूरमधून उमेदवारी जाहिर केली आणि तेव्हापासुन आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांच्यात शाब्दिक चकमक सुरू झाली. जाती-पातीचा राजकारण सुरू झालं. शिवसेनेच्या आढळराव पाटील यांनी सुरवातीपासुनच धडक प्रचारास सुरवात केली आणि त्यामध्ये मतदान होईपर्यंत सातत्य ठेवले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिरूर मतदार संघात त्या तोडीचा प्रचार झाला नाही असे ठिकठिकाणचे बातमीदार कळवतात. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात आढळराव पाटील डेंजर झोनमधून सेफ झोनमध्ये आले आहेत. दि. २३ मे रोजी खरच आढळराव पाटील सेफ झोनमध्ये आहेत काय याचे उत्‍तर मिळाणार आहे.

तीन वेळा खासदार म्हणुन निवडुन आलेला अनुभव आणि शिवसैनिकांचे पाठबळ याच्या जोरावरच आढळराव पाटील हे निवडुन येतील अशी चर्चा शिरूर मतदार संघामध्ये आहे. डॉ. अमोल कोल्हे यांनी प्रचाराच्या सांगता सभेत आपण शिवसेना का सोडली हे स्पष्ट केले. त्यावरून देखील शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली आणि त्यानंतर शिवसैनिकांनी मतदानाच्या दिवशी प्रत्येक मतदारांना मतदानाचे आवाहन करून आढळराव पाटील यांच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. मतदार संघातील हडपसर आणि कोंढवा भागात नक्‍कीच डॉ. अमोल कोल्हे यांना मताधिक्य मिळेल पण इतर ठिकाणावरून आढळराव पाटील यांना चांगला प्रतिसाद मिळाल्याचे ठिकठिकाणचे बातमीदार कळवितात. मतदार संघामध्ये येणार प्रत्येक गावात जावुन आढळराव पाटील यांनी प्रचार केला. वृध्द, ज्येष्ठ आणि तरूण मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या. सन २०१४ मधील निवडणुन आढळरावांना खुप सोपी गेली होती. मात्र, यंदाची निवडणुक ही सोपी जाणार नाही याची जाणीव त्यांना होती. त्यामुळे त्यांनी प्रचार यंत्रणा योग्यरित्या राबविली तसेच गावो-गावी जावुन प्रचार करणार्‍यावर भर दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि इतर दिग्गज नेत्यांनी मतदार संघात प्रचारसभा घेतल्या आणि डॉ. अमोल कोल्हे यांना मतदान करण्याचे आवाहन केले. अभिनेता असलेल्या डॉ. कोल्हे यांना मतदार संघात पसंती देखील मिळाली मात्र पसंतीचे रूपांतर मतदानात झाले नाही असे ठिकठिकाणचे बातमीदार कळवतात. दि. २३ मे रोजी खरच आढळराव पाटील सेफ झोनमध्ये आहेत काय याचे उत्‍तर मिळणार आहे.