शरद पवारांचे निकटवर्तीय आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव भोसले यांचं 81 वर्षी निधन

नीरा, पोलीसनामा आँनलाईन – वाणेवाडी (ता.बारामती) येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खा. शरद पवार यांचे निकटवर्तीय शिवाजीराव (आण्णा) यशवंतराव भोसले (वय ८१) यांचे आज शुक्रवारी (दि.३०) वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. गेल्याच आठवड्यात त्यांच्या पत्नींचेही निधन झाले होते. पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे यांचे ते सासरे तर यशवंतराव सोसायटीचे अध्यक्ष प्रवीण भोसले यांचे ते वडील होत.

पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्षपद तसेच बारामती पंचायत समितीचे माजी सभापती, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक तसेच पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सदस्य म्हणूनही भोसले यांनी काम पाहिले. वाकी येथील न्यू इंग्लिश स्कूल पांढरवस्तीचे संस्थापक म्हणून त्यांनी परीसरात शिक्षण संस्था सुरू करत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली. सहकारी सोसायट्या पतसंस्था स्थापन करत सहकार चळवळ सुरू केली.