राष्ट्रवादीकडून ‘हे’ 2 नवे चेहरे ‘विधान परिषदे’वर, उद्या घेणार आमदारकीची शपथ

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसने संघटनेत काम करणाऱ्यांना पदावर स्थान देण्याचे ठरवले आहे. तसे धोरण अंमलात आणण्यात आले असून प्रदेश सरचिटणीस म्हणून गेली काही वर्षे जबाबदारी सांभाळणारे शिवाजीराव गर्जे आणि युवती राष्ट्रवादीच्या मुंबईच्या अध्यक्षा आदिती नलावडे यांना विधान परिषदेवर घेण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे. गर्जे आणि नलावडे यांचा उद्याच तातडीने आमदारकीचा शपथविधी होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सहा वर्षापूर्वी राज्यपाल नियुक्त सदस्य विधान परिषदेवर घेण्यात आले होते. यातील राहुल नार्वेकर यांनी पदाचा राजीनामा देऊन शिवसेनेकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती. यामध्ये नार्वेकर विजयी झाले आहेत. तर राम वडकुते यांनी पक्षावर नाराज होऊन आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या दोन जागांवर राष्ट्रवादीने तातडीने नवीन दोन चेहरे देण्याचा निर्णय घेतला.

आदिती नलावडे या विधानसभेचे माजी अध्यक्ष व शिवसेनेचे नेते दत्ताजी नलावडे यांच्या पुतणी आहेत. वरळीमधून आदित्य ठाकरे यांच्याविरोधात निवडणूक लढविण्यासाठी त्यांच्या नावाची चर्चा होती. आक्रमक कार्य़कर्त्या म्हणून त्यांची ओळख आहे. तर शिवाजीराव गर्जे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयातील सर्व कामकाज पाहतात. राष्ट्रवादीकडून अमोल मेटकरी यांना संधी दिली जाईल अशी चर्चा होती. मात्र, त्यांच्याऐवजी दोन नवीन चेहऱ्यांना राष्ट्रवादीने संधी दिली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/