‘जे हाय ते हाय जे नाय ते नाय’

उदयनराजेंपाठोपाठ शिवेंद्रराजेंची डायलॉगबाजी

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – उदयनराजे भोसले हे आपल्या खास शैलीमुळे आणि त्यांच्या डायलॉगबाजीमुळे तरुणाईत प्रसिद्ध आहेत. कधी डायलॉग बाजी करुन तर कधी शर्टाची कॉलर पकडून विरोधकांवर ते आपला निशाणा साधत असतात. उदयनराजेंपाठोपाठ आता शिवेंद्रराजेंनीही डायलॉगबाजी करण्यास सुरुवात केली आहे. नुकताच त्यांच्या डायलॉगबाजीचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

साताऱ्याचे आमदार शिवेद्रराजे यांचा एक व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिवेंद्रराजे यांच्या वाढदिवसा दिवशीचा हा व्हीडीओ आहे. कार्यकर्त्यांनी शिवेंद्रराजे यांना त्यांच्यावर रचलेले गाणे ऐकून दाखवले. यानंतर शिवेंद्रराजे यांनाही डायलॉगबाजी ऐकवण्याचा मोह आवरता आला नाही. कार्यकर्त्यांसमोर त्यांनी मिशा पिळत ‘जे हाय ते हाय जे नाय ते नाय’ हा डायलॉग बोलून दाखवला. यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. सोशल मीडियावर या प्रसंगाचा व्हीडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

साताऱ्याच्या राजकारणात उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांची नेहमीच चर्चा असते. या दोन्ही नेत्यांमधील संघर्षामुळे स्थानिक राजकारणात नेहमीच तणाव असतो. मात्र, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दोघांमध्ये समेट घडवून आणला होता.