… तर मराठयांचं दुसरे सामाजिक पानिपत होईल : शिवेंद्रराजे भोसले

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन –   इतिहासात मराठ्यांचे पानिपत झाले, असे नेहमी सांगितले जाते. आता जर आपण एकत्र आलो नाहीतर आपले दुसरे सामाजिक पानिपत होईल, असा इशारा आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला. ते साताऱ्यात मराठा समाज आयोजित गोलमेज परिषदेत बोलत होते.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने मराठा समाजातील तरुण-तरुणींमध्ये नाराजी आहे. म्हणून राज्य सरकारने या प्रश्नावर तत्काळ तोडगा काढावा, असे म्हणतच आम्हाला आमचे आरक्षण हवे आहे. त्यामुळे इतर समाजाने घाबरू नये, असे शिवेंद्रराजे भोसले यांनी नमूद केलं. तसेच राज्य सरकारने एमपीएससीच्या मेगा भरतीसोबत अन्य विषयांत गडबड करू नये, असे देखील त्यांनी सांगितलं.

इतिहासाची पुनरावृत्ती नको

मराठा समाज कधीसुद्धा एकत्र येत नाही, असे नेहमी बोलले जाते. मराठा समाजात दरी निर्माण झाल्याने असे सांगितले जाते. म्हणूनच सर्वांनी एकत्र आले पाहिजे. त्याची गरज आहे. वेगवगेळे लढण्याची चूक करू नये. आपण वेगवगळे लढलो तर इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते, असा इशारा त्यांनी दिला. मी इथे राजे अथवा आमदार म्हणून आलो नाही, तर एक मराठा म्हणून या गोलमेज परिषदेला उपस्थित असल्याचे त्यांनी म्हटलं.

इतिहासामध्ये मराठ्यांचे पानिपत झाले, असे बोलले जाते. आपण एकत्र आलो नाहीतर आपले दुसरे सामाजिक पानिपत होईल, यावेळी मात्र इतिहास तुम्हाला पुन्हा माफ करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठा आरक्षणात लक्ष घालण्याची मागणी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केली.

सरकार गंभीर नाही – आबा पाटील

मराठा आरक्षण उपसमितीचा मराठा समाजास काहीदेखील उपयोग झाला नाही. म्हणून ही समिती बरखास्त करुन नव्या सदस्यांचा समितीत समावेश करावा. काम करणाऱ्यांनाच समितीमध्ये घेण्यात यावे. मराठा समाजाच्या कोणत्याही मागणीवर आणि विषयावर सरकार गंभीर नाही, मुळात भूमिका घेण्यातच सरकार अपयशी असल्याचा, आरोप मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबा पाटील यांनी केला.