‘सत्तेत नसतानाही करून दाखवलं अन् आता पुढची रणनीतीही ठरली’

पोलीसनामा ऑनलाइन – सातारा शहराची हद्दवाढ मंजूर करण्याबाबतचा शब्द पालिकेच्या निवडणुकीवेळेस नगरविकास आघाडीच्या वतीने सातारकरांना दिला होता. तो शब्द खरा करुन दाखवला असल्याचं आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी सांगितलं. तसेच येणाऱ्या काळामध्ये शहरात औद्योगिक वसाहतीसाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आमदार भोसले यांनी स्पष्ट केलं.

अनेक वर्षांपासून सातारा शहराचा हद्दवाढीचा प्रस्ताव प्रलंबित होता. तो प्रस्ताव मुंबई येथे सुरु असलेल्या अधिवेशनात मंजूर करुन घेण्यात आला असून, त्यासंदर्भातील अधिसूचना आज (मंगळवार) सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी स्वीकारली. शहराची हद्दवाढ झाल्यास शहरालगतच्या उपनगरे आणि त्रिशंकू भागांच्या विकासाला चालना मिळेल. तसेच सातारा शहराचा आणि आसपासच्या परिसराचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी आणि नागरिकांना दर्जेदार सोयी-सुविधा मिळवण्यासाठी हद्दवाढीचा प्रस्ताव मंजूर होणे आवश्यक होते. त्यासाठी शिवेंद्रसिंह राजे सातत्याने पाठपुरावा करत होते. त्यांच्या पाठपुराव्याला आज यश प्राप्त झाले.

दिलेला शब्द पूर्ण केला…
नगरविकास आघाडीच्या वतीने सातारा पालिकेच्या निवडणुकीदरम्यान शहराची हद्दवाढ मंजूर करुन घेण्याबाबत शब्द दिला होता. तो खरा करुन दाखवला. सातारा पालिकेत आघाडीची सत्ता नसताना शहराच्या विकासकामांकडे कधीही दुर्लक्ष केले नाही. सातारकरांचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच प्राधान्य दिले. सत्ता नसताना सुद्धा सातारकरांना दिलेले शब्द पूर्ण केल्याचं शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी नमूद केलं. तसेच आगामी काळात औद्योगिकीकरणाला चालना देण्यासाठी मोठे उद्योगधंदे, कंपन्या साताऱ्यात आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलं.

तथापि, सातारची हद्दवाढ झाल्याने पालिकेच्या उत्पन्नात वाढ होणार असून शहरासह त्रिशंकू भागाच्या विकासास चालना मिळणार आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेला आणि सातारकरांसाठी अत्यावश्यक असणारा प्रश्न मार्गी लागल्याने सातारकर आणि उपनगरातील नागरिकांमधून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. शहरातील मोती चौक येथे नगरविकास आघाडीच्या नगसेवक, नगसेवकांनी नागरिकांना कंदी पेढे वाटले.