मध्य प्रदेशात मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग

भोपाळ – देशभरात लॉकडाउन सुरू असताना सत्तापालट झालेल्या मध्य प्रदेशातील सरकारमध्ये आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेगवान हालचाली सुरू आहेत. मुख्यमंत्रीपदाची माळ गळ्यात घालण्यासाठी मदत केलेल्या आमदारांना मंत्रिपदे देण्याची कसरत मुख्यमंंत्री शिवराजसिंह चौहान यांना करावी लागणार आहे. चौहान यांनी रविवारी भाजप प्रदेशाध्यक्ष व्ही. डी. शर्मा आणि महामंत्री सुहास भगत यांच्याशी चर्चा केली आहे. 22 ते 24 जणां मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात येईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले ज्योतिरादित्य शिंदे यांच्या समर्थकांबरोबरच काँग्रेसमधून आलेल्या 22 पैकी 11 जणांनातरी मंत्रिपद द्यावे लागणार असल्याने चौहान यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. भाजपच्या केंद्रीय नेत्यांशी चर्चा करून मंत्रिमंडळ विस्तार कधी करायचा व कुणाला त्यात स्थान द्यायचं हा निर्णय घेतला जाणार आहे. याच आठवड्यात चौहान आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, भाजपमधील 40 आमदारांनी मंत्रिपदासाठी आपला दावा केला आहे.