पंढरपुरात शिवसैनिकांची दानवेंविरोधात घोषणाबाजी

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज पंढरपूरमध्ये सभा होणार आहे. त्यांच्या या दौऱ्याआधी शिवसैनिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळालं. याचवेळी  राम मंदिर बांधण्याची मागणीही यावेळी घोषणाबाजी करणाऱ्या शिवसैनिकांनी केल्याचे दिसून आले.
आज पंढरपूर येथील सभेमध्ये उद्धव ठाकरे राम मंदिर, कर्जमाफी अशा विविध मुद्द्यावर नेमकं काय भाष्य करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. परंतु शिवसैनिकांमध्ये युतीला घेऊन जास्त उत्सुकता असल्याचे दिसते आहे. त्यांचे लक्ष याकडे आहे की युतीच्या मुद्द्यावर नेमकं ते काय बोलतील.
‘रावसाहेब दानवे यांचं करायचं काय, खाली डोके वर पाय’, ‘राम मंदिर झालंच पाहिजे’ अशी घोषणाबाजी स्थानिक शिवसैनिकांनी यावेळी केली.
महिन्याभरापूर्वीच( 24 नोव्हेंबर व 25 नोव्हेंबर) उद्धव ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा पूर्ण केला आणि यानंतर आता आज ते पंढरपूर दौरा करणार आहेत. मुख्य म्हणजे योध्या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे यांचा हा महत्वाचा दौरा मानला जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण पंढरपूर भगवेमय झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या पंढरपूर दौऱ्यामध्ये  उद्धव यांची सभाही होणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे या सभेमध्ये  राम मंदिर, कर्जमाफी अशा विविध मुद्द्यावर नेमकं काय भाष्य करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.