निवडणुकीच्या तोंडावर शिवसैनिकांचे सामुहिक राजीनामे

पक्षप्रमुख ठाकरे रविवारी उस्मानाबादेत

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – निवडणूक प्रक्रियेत सामावून न घेता गैरविश्वास दाखविला जात आहे. सेनेच्या उमेदवाराचा निवडणूक अर्ज दाखल केलेल्या दिवसापासून कोणत्याही कार्यक्रमाची माहिती उमरगा आणि लोहारा तालुक्यातील शिवसैनिकांना दिली जात नाही. तालुक्यातील शिवसैनिकांना बेदखल करून सुरू असलेल्या प्रक्रियेमुळे नाराज झालेल्या उमरगा आणि लोहारा तालुक्यातील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकार्‍यांनी जिल्हाप्रमुखाकडे आपले सामुहिक राजीनामे सादर केले आहेत. रविवारी उध्दव ठाकरे उस्मानाबाद येथील महायुतीच्या जाहीर सभेसाठी येणार आहेत. तत्पूर्वी शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी दिलेल्या सामुहिक राजीनाम्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचा उमेदवार ऐनवेळी बदलण्यात आला. विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांना डावलून माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली. त्याचवेळी उमरगा आणि लोहारा तालुक्यातील शिवसैनिकांनी जाहीररित्या आपली नाराजी व्यक्त केली होती. मुंबई येथे शिवाजी पार्कवर बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीसमोर जावून  उमेदवार न बदलल्यास सामुहिक राजीनामे देणार असल्याचा इशारा शिवसैनिकांनी दिला होता. त्यानंतर मागील काही दिवसांत शांत असलेल्या उमरगा आणि लोहारा तालुक्यातील शिवसैनिकांनी निवडणुकीच्या चार दिवस अगोदर राजीनाम्याचे शस्त्र उगारले आहे.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख यांना पत्र लिहून आपण सामुहिक राजीनामे देत असल्याचे त्यावर नमूद करण्यात आले आहे. चालू लोकसभा निवडणुकीत शिवसेना पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी उमरगा तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व निष्ठावंत शिवसैनिकांनी कुठल्याही निवडणूक प्रक्रियेची अथवा कार्यक्रमाची माहिती न देता मनमानीपणा सुरू केला असल्याचे त्यात म्हटले आहे. उमरगा आणि लोहारा तालुक्यातील शिवसैनिकांना विश्वासात न घेता उमेदवारी दाखल केल्यापासून आजपर्यंत जाणूनबुजून सर्व प्रक्रियेपासून दूर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण सामुहिक राजीनामे देत असल्याचे या पत्रात म्हटले आहे. त्यावर शिवसेनेचे उमरगा तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे, डिग्गी विभागाचे उपतालुकाप्रमुख शेखर पाटील, येणेगूर विभागाचे उपतालुकाप्रमुख दिपक जोमदे, गुंजोटीचे उपतालुकाप्रमुख मोहयोद्दीन सुलतान, मुरूम विभागाचे उपतालुकाप्रमुख शेखर मुदकण्णा, तुरोरीचे उपतालुकाप्रमुख सुधाकर पाटील यांची स्वाक्षरी आहे.

राजीनामा मिळाला आहे : जिल्हाप्रमुख पाटील

शिवसेनेचे उमरगा येथील तालुकाप्रमुख बाबुराव शहापूरे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा मेल करून पाठविला आहे. आपल्याकडे तो प्राप्त झाला असून आपण तो अद्याप मंजूर केलेला नाही. निवडणूक कालावधीत असे पाऊल उचलणे पक्षहितासाठी योग्य नाही. त्यांची समजूत काढण्यात येईल. अन्य पदाधिकारी शिवसैनिकांचे राजीनामे मात्र अद्याप आपल्याकडे प्राप्त झाले नसल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख कैलास पाटील यांनी दिली आहे.