विनायक मेटेंकडून शिवस्मारकाचं गुपचूप भूमिपूजन

मुंबई : वृत्तसंस्था – छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील शिवस्मारकाचं भूमिपूजन शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केल्याचे समोर आले आहे. विनायक मेटे यांनी पुजारी आणि काही मोजक्या समर्थकांना घेऊन भूमिपूजन केल्याची माहिती समजते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षांपूर्वीच शिवस्मारकाचं अरबी समुद्रात जलपूजन केलं होतं.

त्यानंतर कोणालाही फारशी कल्पना न देता शिवस्मारकाचं गुपचूप अंधारात भूमिपूजन करण्यात आलं आहे. विनायक मेटे यांनी हे भूमिपूजन का केलं? याचं कारण तेच सांगू शकतात मात्र अंधारात भूमिपूजन करणे योग्य नाही असे भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी म्हटले आहे.

तर विनायक मेटे यांच्याकडून दुसऱ्यांदा भूमिपूजन कार्यक्रमावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी टीका केली आहे. स्मारकाचं किती वेळा भूमिपूजन करणार हा मोठा प्रश्न आहे. याआधीही त्यांनी प्रयत्न केला होता. त्यावेळी बोट बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला होता. पण तरीही या सरकारवर कोणता तरी दबाव आहे त्यामुळे असं कृत्य घडतंय अशी टीका मलिक यांनी केली.

राज्यात अंधश्रद्धा निर्मुलन कायदा लागू करण्यात आलं तरीही मेटेंकडून असा कार्यक्रम होत असेल तर यावर संशय निर्माण होत आहे. त्यांच्यावर कुठल्या तरी भोंदूबाबांचा परिणाम तर नाही ना अशी शक्यता वाटत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे अशी मागणीही मलिक यांनी केली.

२४ ऑक्टोबरला विनायक मेटे यांनी शिवस्मारकाच्या पायाभरणीच्या पूजनाचा कार्यक्रम निश्चित केला होता. मात्र यावेळी समुद्रात बोट धडकली आणि सिद्धेश पवार या तरूणाचा मृत्यू झाला. या अपघातातून २५ जणांना वाचवलं गेलं मात्र सिद्धेशचा मृत्यू झाला. या घटनेनंतर विरोधकांनी या प्रकारावर ताशेरेही झाडले होते. असे असूनही मेटे यांनी पुन्हा एकदा लपतछपत जाऊन शिवस्मारकाचे भूमिपूजन केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांनी हे का केले याचे कारण तेच सांगू शकतात. मेटे यांनी एका पुजाऱ्याला सोबत घेतलं होतं आणि मोजके समर्थक या ठिकाणी होते त्यांच्या उपस्थितीत हे भूमिपूजन करण्यात आलं असंही समजतं आहे.