भाजपाकडून वेळावेळी होणार्‍या वैयक्तिक आरोपांवर आदित्य ठाकरेंनी अखेर सोडलं मौन, दिलं मेस्सी आणि रोनाल्डोचं उदाहरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी भाजपाकडून होणाऱ्या टीकेला अखेर उत्तर दिलं आहे. “भाजपाला माझ्यापासून भीती वाटत असल्यानेच वैयक्तिक हल्ला करत आहे. महाविकास आघाडी सरकार चांगलं काम करत आहे. त्याच्यावर कोणीही प्रश्न उपस्थित केले नाहीत.”

आदित्य ठाकरे यांनी विरोधकांवर साधला निशाणा
महाविकास आघाडी चांगलं काम करत असून कोणीही त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाहीत ही आमच्यासाठी दिलासा देणारी बाब आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष करणं जास्त योग्य असल्याचा मी विचार केला. कामावर संपूर्ण लक्ष असल्याने तिकडे लक्ष गेलं नाही. यामुळे चुकीचे आरोप आणि वैयक्तिक हल्ले झाले. पण पाच वर्ष आम्ही काम करु, राजकारण नाही. जिथपर्यंत माझ्यावर वैयक्तिक हल्ला होण्याची गोष्ट आहे. तुम्ही फुटबॉल पाहिलं असेल तिथे मेस्सी किंवा रोनाल्डो यांच्यासाठी मॅन टू मॅन मार्किंग केली जाते. त्यांनी गोल करु नये यासाठी घेरण्यात आलेलं असतं. कदाचित त्यांना माझ्यापासून भीती वाटत असेल.

बॉलिवूडपासून ते मुंबई पोलिसांपर्यंत झालेले वाद यावर काय म्हणाले आदित्य ठाकरे
जोपर्यंत आपलं सरकार होतं तोपर्यंत सर्व काही व्यवस्थित होतं असं विरोधकांना वाटत आहे. विमान भरुन दिल्लीला कार्यक्रमात जात असत. त्यांच्यासाठी गाणी गात होते. त्यांच्याशी चांगले संबंधही होते. पण जेव्हापासून सरकार गेलं तेव्हापासून त्यांना ते वाईट वाटू लागले आहेत. बॉलिवूड, मुंबईचे लोक वाईट वाटू लागले. मुंबईला ड्रग्ज सेंटर म्हणण्यात आलं. सरकार बदलल्याने त्यांच्या चश्म्याचा नंबरही बदलला असावा. त्याच्या पोटात दुखत आहे. मुंबई, महाराष्ट्रात होणाऱ्या चांगल्या गोष्टींमुळे वाईट वाटत असून आरोप करत सुटले आहेत.