‘भाजपच्या पोपटाला पिंजऱ्यात टाकलंय !’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   रिपब्लिक टीव्हीचे (Republic TV) संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांना रायगड पोलिसांनी मुंबई येथील घरातून ताब्यात घेत अटकेची कारवाई केली आहे. 2018 साली इंटिरियर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणी (Anvay Naik Suicide Case) अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. या अटकेनंतर केंद्रातील भाजप नेत्यांकडू राज्य सरकारवर टीका होताना दिसत आहे. अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरून आता अनेक आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी आता या टीकेला उत्तर दिलं आहे. अर्णब यांच्या अटकेचा माध्यम स्वातंत्र्याशी काहीही संबंध नाही असं ते म्हणाले आहेत.

अनिल परब म्हणाले, “अर्णब गोस्वामींच्या अटकेचा माध्यम स्वातंत्र्याशी काहीही संबंध नसून आत्महत्येप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात ही कारवाई करण्यात आली आहे. एका खुनी माणसाला वाचवायचं काम भाजप करत आहे. गुन्हेगाराला पोलिसांनी ताब्यात घेतलं तर महाराष्ट्र आणीबाणीकडे चालला म्हणून ओरडायचं. सुसाईड नोटमध्ये अर्णब यांचं नाव होतं, नाईक कुटुंबीय कोर्टात गेले होते. त्यानंतर त्यांना तपासाची परवानगी दिली.” अशी माहिती परब यांनी दिली आहे.

अनिल परब पुढं म्हणाले, “भाजप असं ओरडतंय जणू काही तो पक्षाचा कार्यकर्ता आहे. त्यामध्ये वृत्तपत्र स्वातंत्र्याचा प्रश्न कुठे येतो. सूडबुद्धीनं कारवाई करण्यात आलेला आरोप चुकीचा असून अर्णब गोस्वामींना भाजप का वाचवत आहेत. त्यांना गुन्हेगार म्हणून अटक केलेली नाही तर तपासासाठी ताब्यात घेतलं आहे.” असंही त्यांनी सांगितलं आहे.

परब म्हणाले, “एका मराठी महिलेचं कुंकू पुसलं गेलं. त्याला वाचवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. भाजपच्या पोपटाला पिंजऱ्यात टाकलं आहे. त्याच्यात त्यांचा जीव अडकला आहे का ? महाविकास आघाडीबद्दल एवढी लोक बोलत आहेत परंतु आम्ही त्यांना आत टाकत नाहीत. अर्णब यांच्या तोंडातून काही नावं बाहेर पडतील अशी भाजपला भीती आहे.”