शिवनेनेला ‘महाजॉब्स’ प्रकरणाची ‘ती’ चूक मान्य, व्यक्त केली दिलगिरी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –  राज्य सरकारच्या ‘महाजॉब्स पोर्टल’च्या जाहिरातीत कुठल्याही काँग्रेस नेत्याला स्थान दिले नाही. याबद्दल महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा नाराजीनाट्य सुरू झाले आहे. या मुद्द्यावरून काँग्रेसच्या दोन नेत्यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली. त्यानंतर शिवसेनेने लगेच याबाबत चूक काबुल करत दिलगिरी व्यक्त केली आहे.

राज्यातील भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ठाकरे सरकारने नुकतेच ‘महाजॉब्स’ हे ऑनलाइन पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलची जाहिरात सध्या अनेक ठिकाणी प्रसिद्ध होत आहे. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे छायाचित्र आहे. त्याचबरोबर सुभाष देसाई, दिलीप वळसे-पाटील, नवाब मलिक आणि आदिती तटकरे यांचीहि छायाचित्रे आहेत. हे सगळे मंत्री शिवसेना आणि राष्ट्रवादीचे आहेत. मात्र, काँग्रेसच्या एकाही मंत्र्याचे छायाचित्र जाहिरातीत दिसत नाही. त्यावरून महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

‘महाजॉब्स’ ही योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे की शिवसेना-राष्ट्रवादीची? महाविकास आघाडी होत असताना, ठरलेल्या किमान समान कार्यक्रमाची आणि त्यातील शिष्टाचारांची अंमलबजावणी का होत नाही?,’ असा प्रश्न सत्यजीत तांबे यांनी उपस्थित केला आहे.

खासदार राजीव सातव यांनीही हे ‘सरकार आघाडीचे आहे. जनतेसमोर जाताना सर्वांनीच काळजी घ्यायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

हे प्रकरण अधिक चिघळू नये, म्हणून उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी लगेच दिलगिरी व्यक्त केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना ही माहिती दिली. ‘जाहिरातीत काँग्रेस नेत्यांचे फोटो असणे आवश्यक आहे. सत्यजीत तांबे यांनी त्याच भावनेतून ट्विट केले असेल. पण, सुभाष देसाई यांनी याबाबत फोन करून दिलगिरी व्यक्त केली आहे,’ असेही थोरात यांनी सांगितले आहे.