दानवे माझी ‘मेहबूबा’ ; मी त्यांच्यावर ‘प्रेम’ करतो, ते माझ्यावर ‘इश्क’ करतात 

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – रावसाहेब दानवे यांच्या प्रचार सभेत अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवे माझी मेहबूबा असल्याचे वक्तव्य करत दोघांतील वितुष्ट संपल्याची जाहीर कबूली दिली. लोकसभा निवडणुकीपूर्वी खोतकर-दानवे यांच्यातील वितुष्ट अख्या राज्याने पाहिले होते. खोतकरांनी दानवे विरोधात निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली होती. मात्र पक्ष श्रेष्ठींनी समजूत घातल्यानंतर दोघांचे मनोमिलन झाले.

प्रचार सभेत खोतकर यांनी दानवे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. मी आणि रावसाहेब ३० वर्षापासून जोडीदार आहोत. खरे तर रावसाहेब दानवे माझी मेहबूबा आहे. मी त्यांच्यावर प्रेम करतो, ते माझ्यावर इश्क करतात, असे म्हणताच उपस्थित असणाऱ्या दानवेंच्या चेहऱ्यावर हसू आले होते. दानवे यांच्यासह उपस्थित लोकांमध्ये एकच हशा पिकला होता.

पुढे बोलताना खोतकर म्हणाले की, ३० वर्षांपासून सोबत असलेली ही जोडगोळी राज्याच्या विधानसभेपासून लोकसभेपर्यंत काम करते. शिवसेनेच्या वतीने मी सर्वांना विनंती करतो की, यावेळी आपल्याला नवा इतिहास घडवायचा आहे. दानवे यांना प्रचंड मताधिक्यांनी विजयी करून लोकसभेत पाठवायचे आहे.

जालना मतदार संघामध्ये भाजपाकडून रावसाहेब दानवे पाचव्यांदा निवडणुक रिंगणात उतरले आहेत. दानवे आणि शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांच्यातील वादामुळे जालना मतदार संघ राज्य पातळीवर चर्चेत आला होता. पण अर्जुन खोतकर यांच्या या पवित्र्यामुळे आता नाराज शिवसैनिक काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

You might also like