आता ‘त्यांना’ जबाबदार धरता येणार नाही, शिवसेनेचा मोदी सरकारवर ‘हल्लाबोल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या देशाची एकूण परिस्थिती बघता शिवसेनेने भाजपावर जोरदार हल्ला केला आहे. देशातील ढासळती अर्थव्यवस्था आणि आवाक्याबाहेर गेलेले कांद्याचे भाव यामुळे जनता त्रस्त झाली असून ‘देशाची अर्थव्यवस्था आजारी आहे, पण मोदी सरकार ते मानायलाच तयार नाही. आजार लपवल्यामुळं अर्थव्यवस्थेला नायटा झाला आहे,’ अशी टीका शिवसेनेचे मुखपत्र दैनिक ‘सामना’तील अग्रलेखातून करण्यात आली आहे.

‘देशाच्या अर्थव्यवस्थेचा जो बोजवारा उडाला आहे, त्यासाठी आता पंडित नेहरू व इंदिरा गांधी यांनाही जबाबदार धरता येणार नाही,’ असंही सामनातून प्रखरपणे मांडले आहे. नुकतेच रघुराम राजन यांनी पंतप्रधान कार्यालयाच्या एकाधिकारशाहीमुळं अर्थव्यवस्था धोक्यात आल्याचं मत व्यक्त केले होते. त्यांच्या पाठोपाठ शिवसेनाही आता आक्रमक झाली असून देशाच्या अर्थव्यवस्थेस लकवा मारला आहे हे स्पष्ट दिसत आहे. त्यासाठी डॉक्टरच्या निदानाची गरज नाही. सर्वच क्षेत्रामध्ये पडझड सुरू आहे, पण सरकार मानायला तयार नाही. कांदा नाकाला लावून बेशुद्ध व्यक्तीला शुद्धीवर आणले जाते, पण आता बाजारातून कांदाच गायब झाल्यानं तेही शक्य नाही, असा सणसणीत टोला ‘सामना’ या वृत्तपत्रातून करण्यात आला आहे.

अग्रलेखातील ठळक मुद्दे
1) भाजपाने निर्मला सीतारामन यांना देशाचे अर्थमंत्री बनवले आहे, परंतु त्यांचे अर्थकारणात कसलेही योगदान नाही. तसेच तज्ज्ञांचं ऐकून घेतलं जात नाही. सरकारच्या दृष्टीनं अर्थव्यवस्था म्हणजे शेअर बाजारातील ‘सट्टा’ झाला आहे.

2) ज्या वेळेस मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी कांद्याच्या दराबद्दल चिंता व्यक्त केली होती. कांदा लॉकरमध्ये ठेवण्याची वेळ आल्याचं त्यांनी म्हटलं होतं. मात्र, आता त्यांची भूमिका पूर्णपणे वेगळी आहे.

3) खरं तर राज्यकर्त्यांना अर्थमंत्री, रिझर्व्ह बँक गव्हर्नर, अर्थ सचिव, नीती आयोगाचे अध्यक्ष हे सगळे आपल्या मुठीत राहणारे पाहिजेत व हेच आजाराचे मूळ कारण आहे. अशा परिस्थितीत ‘जय जय रघुराम समर्थ’ म्हणण्याशिवाय दुसरा पर्याय देखील नाही.

4) देशाच्या अर्थव्यवस्थेचा जो बोजवारा उडाला आहे, त्यासाठी आता पंडित नेहरू व इंदिरा गांधी यांनाही जबाबदार धरता येणार नाही, अशी सरकारची अवस्था आहे. कारण पंडित नेहरू व त्यांच्या सहकाऱ्यांनी जे कमावले ते विकून खाण्यातच सध्या धन्यता मानली जात आहे.

Visit : Policenama.com