…तर विधानसभेतही ‘महायुती’ला मिळू शकते बहुमत ; ‘महाआघाडी’ला अवघ्या ५६ जागा ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत एनडीएने अनपेक्षित आणि धक्कादायक असा विजय मिळवला. तब्बल ३५२ जागा मिळवत महाआघाडीचा धुव्वा उडवला. या विजयानंतर एनडीएसाठी अनुकुल वातावरण निर्माण झाले असल्याचे एका मराठी वृत्तवाहिनीने आपल्या वृत्तात म्हटले आहे. येत्या काही महिन्यात महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार असून जनतेचा कल असाच राहिल्यास लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही महायुती बाजी मारू शकते. २८८ पैकी महाआघाडीला केवळ ५६ जागा मिळतील तर महायुतीला २२६ तर इतरांना ६ जागा मिळतील असा अंदाज एका मराठी वृत्तवाहिनीने वर्तविला आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महाआघाडीची धुळधाण उडाली. काँग्रेसची आवस्था तर बिकट झाली आहे. राष्ट्रवादीने काही जागा जिंकून महाआघाडीची लाज राखली. वंचित बहुजन आघाडीला केवळ एक जागा जिंकता आली. तर अन्य सर्व जागा महायुतीने पटकावल्या आहेत. मुंबईतील तर सर्वच्या सर्व जागा महायुतीने जिंकल्या आहेत. याचा फायदा महायुतीला आगामी विधानसभा निवडणुकीतही होण्याची शक्यता आहे.

एका मराठी वृत्तवाहिनीने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकाचा अंदाज वर्तविला असून त्यानुसार आगामी विधानसभा निवडणुकीत २८८ जागांपैकी शिवसेना-भाजप युतीला २२६, काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडी – ५६ तर इतरांना ६ जागा मिळतील. मुंबईत भाजप-शिवसेना – ३१, काँग्रेस-राष्ट्रवादी – ३, समाजवादी पार्टी – १ आणि एमआयएमला १ जागा मिळेल असा अंदाज आहे. तर कोकणात भाजप-शिवसेना – २७, काँग्रेस-राष्ट्रवादी (बहुजन विकास आघाडीसह) – ८, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष- १ जागा मिळण्याची शक्यता आहे. मराठवाडातील ४८ जागांपैकी भाजप-शिवसेना – ३९, काँग्रेस-राष्ट्रवादी – ६, वंचित बहुजन आघाडी-एमआयएम – २ आणि अपक्षांना १ जागा मिळून शकते. विदर्भातील ६० जागांपैकी भाजप-शिवसेना – ४९, काँग्रेस-राष्ट्रवादी-स्वाभिमानी – ११, उत्तर महाराष्ट्र (३६ जागा) : भाजप-शिवसेना – ३१, काँग्रेस-राष्ट्रवादी-स्वाभिमानी – ५, पश्चिम महाराष्ट्र (७२ जागा) : भाजप-शिवसेना – ४९, काँग्रेस-राष्ट्रवादीला २३ जागा मिळतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.