शिवसेनेच्या बुरखा बंदीच्या मागणीवर ओवेसींची सटकली म्हणाले… 

हैद्राबाद : वृत्तसंस्था – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ मधून लिहिलेल्या अग्रलेखाबाबत प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. रावणाच्या लंकेत जे घडले ते रामाच्या अयोध्येत कधी घडणार? असा सवाल करीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ तील अग्रलेखामधून बुरख्यावर बंदी घालण्याची मागणी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली आहे.  यावरून आता एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे.

याबाबत बोलताना ओवेसी म्हणाले, त्यांचा हा जो अग्रलेख आहे तो आचारसंहितेचा भंग आहे. त्यांचा हा अग्रलेख पेड न्युजमध्ये देखील येतो. या अग्रलेखात  व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणली आहे. शिवसेनेची बुरखाबंदीची मागणी ही आक्षेपार्ह आहे. शिवसेनेचा हा मुस्लिमविरोधी वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न आहे, असे ओवेसी यावेळी बोलताना म्हणाले. याबरोबरच असदुद्दीन ओवेसी यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे म्हंटले आहे.

शिवसेनेने केलेली मागणी म्हणजे मूलभूत हक्कांवर गदा आणणारी आहे असे सांगत पुढे ओवेसी म्हणाले की  हे तेच लोक आहेत जे कालपर्यंत आपल्या मुलींना जीन्स घातल्यानंतर मारपीट करीत होते आता काय हे लोक ठरवणार का ? कोण काय कपडे घालणार आणि कोण कोणते कपडे घालणार नाही ? उद्या हेच लोकं सांगतील दाढी वाढवू नका टोप्या घालू नका , हे लोक कुठे घेऊन जाणार आहेत देशाला ? असे म्हणत त्यांनी शिवसेनेच्या ‘बुरखा’ बंदीच्या मागणीबाबत संताप व्यक्त केला.

काय आहे ‘सामना’च्या अग्रलेखात

श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटानंतर श्रीलंका सरकराने खबरदारी म्हणून बुरखा किंवा नाकाब परिधान करण्यावर बंदी घातली आहे. त्याच पार्श्वभूमीवर रावणाच्या लंकेत जे घडले ते रामाच्या अयोध्येत कधी घडणार? असा सवाल करीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’तील अग्रलेखामधून बुरख्यावर बंदी घालण्याची मागणी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्या दौऱ्यावर आहेत. म्हणूनच उद्धव ठाकरेंनी मोदींना आपल्या अग्रलेखातून हा सवाल केला आहे.

भारतात ‘बुरखा’, ‘नकाब’ ला बंदी करावी 

त्यांनी पुढे आपल्या अग्रलेखात म्हंटले आहे की, ” हिंदुस्थान, विशेषतः हिंदुस्थानचा जम्मू आणि कश्मीर प्रांत त्याच इस्लामी दहशतवादाने त्रस्त आणि जर्जर झाला आहे. प्रश्न इतकाच आहे की, श्रीलंका, फ्रान्स, न्यूझीलंड आणि ब्रिटनसारखी राष्ट्रे जी कठोर पावले उचलतात तशी पावले आपण कधी उचलणार? विद्यमान सरकारने ‘ट्रिपल तलाक’विरोधात कायदा करून पीडित मुस्लिम महिलांचे शोषण वगैरे थांबवले हे मान्य, पण भीषण बॉम्बस्फोटांनंतर श्रीलंकेत बुरखा आणि नकाबसह चेहरा झाकणार्‍या प्रत्येक गोष्टीवर बंदी घालण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षेसाठी हा निर्णय घेतला असल्याचे राष्ट्रपती मैत्रिपाल सिरिसेना यांनी जाहीर केले. आम्ही या निर्णयाचे स्वागत करीत आहोत व पंतप्रधान मोदी यांनीही श्रीलंकेच्या राष्ट्रपतींच्या पावलावर पाऊल ठेवून हिंदुस्थानातही ‘बुरखा’ तसेच ‘नकाब’ बंदी करावी, अशी मागणी राष्ट्रहितासाठी करीत आहोत”. असे उद्धव ठाकरे यांनी म्हंटले आहे.