शिवसेनेचा मुख्यमंत्री करणारच : उद्धव ठाकरे 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

‘महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री करणारच, असा निर्धार शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. जे आव्हान देण्यासाठी समोर आहेत, त्यांच्या छाताडावर शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवून दाखवेन, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच, विधानसभा, लोकसभेत भगवा फडकवण्याआधी जनतेच्या मनात भगवा रुजवा, असे आवाहन शिवसैनिकांना केले.

शिवसेनेच्या ५२ व्या वर्धापन दिना निमित्त उद्धव ठाकरे बोलत होते.ते पुढे बोलताना म्हणाले, गेली चार वर्षे मोदींनी जनतेला थापा मारल्या, आता मोदी थापा मारण्यासाठी थेट मंगळावरही जातील, तर जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरुन भाजपवर जोरदार हल्ला चढवला. सीमेवर अनेक सैनिकांचे बळी जावे लागले, तेव्हा भाजपला उपरती झाली का? दहशतवादाला रंग नसतो, तर मग रमजानला शस्त्रसंधी का, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. त्यांनी पीडीपीशी युती तोडल्यानंतर भाजपचे अभिनंदन केले.

पगडीवरून हल्लाबोल

पगडीवरुन सुरु असलेल्या राजकारणावरुनही उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. राजकारण करायचे असल्यास डोकी वापरा, दैवतांच्या पगड्या वापरु नका, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी पवारांवर हल्लाबोल केला.