शिवसेना जिल्हाप्रमुखांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात भाजप-शिवसेना युती तुटल्यानंतर राज्यातील आगामी निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढताना दिसणार आहेत. राज्यातील सत्ता समीकरणे बदलल्यानंतर स्थानिक पातळीवर देखील याचा परिणाम होताना दिसत आहे. त्यातच आज मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्हाप्रमुखांची बैठक शिवसेना भवनात घेतली. यावेळी त्यांनी जिल्हाप्रमुखांना मार्गदर्शन करून आगामी निवडणुकीसाठी तयारीला लागा असे आदेश दिले.

राज्यात शिवसेना भाजप युती फिसकटल्यानंतर दोन्ही पक्षांनी स्वतंत्र लढण्याची तयारी सुरु केली आहे. आज शिवसेना भवनात झालेल्या जिल्हाप्रमुखांच्या बैठकित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले. शासनाने घेतलेले निर्णय तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवून पक्षाचे संघटन वाढवण्याचे आदेश दिले. तसेच ज्या प्रमाणे मुंबईत पक्ष संघटन मजबूत आहे तसेच गावागावात पक्ष संघटन करा. यासाठी मुंबई प्रमाणे गावागावात शाखा सुरु करून शाखा प्रमुख नेमण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले. तसेच काम करत असताना दहशत नको, दरारा असू द्या असा सल्ला देखील त्यांनी दिला.

विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदावरून झालेल्या वादामुळे युतीला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी राज्यात युतीचे सरकार स्थापन झाले नाही. निवडणुकीच्या निकालानंतर सर्वाधिक जागा जिंकलेल्या भाजपला विरोधात पक्षात बसण्याची वेळ आली. दोन्ही पक्षांची युती तुटल्यानंतर दोन्ही पक्षांनी आगामी काळातील सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे आगामी काळात शिवसेना-भाजप असा सामना रंगणार असल्याचे पहायला मिळणार आहे.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/