एखाद्या माणसाने किती ‘थपडा’ खाव्यात याला काही मर्यादा… : उद्धव ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – दिल्लीच्या रोड शोमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जीपवर चढून एकाने त्यांच्या श्रीमुखात भडकावली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. एखाद्या माणसाने किती थपडा खाव्यात याला काही मर्यादा आहे की नाही?,’ असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

किती थपडा खाल?’ या मथळ्याखाली आज सामनामधून उद्धव ठाकरे यांनी नेत्यांवर होणाऱ्या हल्ल्यांचा निषेध केला आहे. नेत्यांवर चपला, बूट, शाई फेकून देशातील प्रश्न खरंच सुटणार आहेत काय? संताप व्यक्त करण्यापुरते हे प्रकार मान्य, पण शेवटी संयमाचा बांध फुटतो व हे नको ते प्रकार घडतात. राजकारणात व एकंदरीत समाजातच असहिष्णुता वाढत आहे व लोक मुद्दय़ांवरून गुद्यांवर येत आहेत. शरद पवार यांच्या बाबतीत हा असलाच घाणेरडा प्रकार दिल्लीत झाला तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली होती. असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

सामनाच्या अग्रलेखातील मुद्दे –

‘आप’तर्फे आतिशी मार्लेना या पूर्व दिल्लीतून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. त्यांनीच काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत सांगितले होते की, लोकांचा राजकारण्यांवर राग वाढला आहे. लोक नेत्यांना अजून जाहीर थपडा का मारीत नाहीत? याचे आश्चर्य वाटते. केजरीवाल यांना थप्पड का पडली? याचे उत्तर त्यांच्याच नेत्यांनी दिले, पण आम्ही या प्रकाराशी सहमत नाही.

अरविंद केजरीवाल यांनी गेल्या चार वर्षांत जेवढय़ा ‘थप्पड’, ‘चपला’ खाल्ल्या आहेत तो एक विक्रमच म्हणावा लागेल. केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत व लोकशाही मार्गाने ते निवडून आले आहेत. ते कुणाला नको असतील तर त्यांचा पराभव त्याच मार्गाने करावा लागेल. मारहाण करणे हा मार्ग नाही.

निवडणूक प्रचारात केजरीवाल एका जीपवरून लोकांना अभिवादन करीत असताना एक तरुण अचानक जीपवर चढला व त्याने मुख्यमंत्र्यांचे मुस्काट फोडले. केजरीवाल यांची प्रकृती मुळातच तोळामासाची आहे. त्यामुळे अशा थपडांनी ते कोलमडून जातात.

अरविंद केजरीवाल यांच्यावर आतापर्यंत 12 वेळा असे हल्ले झाले आहेत. कधी अंडे मारले. कधी मिरची पावडर, चपला, शाई फेकली. थपडाही लगावल्या. केजरीवाल हे तिखट बोलतात हे ठीक, पण ते बेलगाम बोलतात. दिल्लीत त्यांच्या ‘आप’ने भाजप तसेच काँग्रेसचा दारुण पराभव केला व सत्तेवर आल्यापासून ते केंद्र सरकार व प्रशासनाशी झगडत आहेत. दिल्लीस पूर्ण राज्याचा दर्जा मिळवून त्यांना मुख्यमंत्री म्हणून अमर्याद अधिकार हवे आहेत. म्हणजे दिल्लीस स्वतःचे गृहमंत्रालय व पोलीस बळ हवे. ते शक्य नाही.

केजरीवाल सरकारने शिक्षण व आरोग्य क्षेत्रांत चांगले काम केले. त्यांनी सरकारी शाळांचा दर्जा सुधारला व मोहल्ला क्लिनिकने गरीबांची सोय केली. त्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. पण त्यांना मधल्या काळात पंतप्रधान पदाचीच स्वप्नं पडू लागली व त्याच भ्रमिष्ठ अवस्थेत केंद्र सरकारवर बेलगाम आरोप सुरू केले.

You might also like