उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची ‘फोन पे चर्चा’, सत्ता स्थापनेचा पेच सुटणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑानलाइन – आज राज्यातील राजकीय घडमोडी वेगवान झाल्या आहेत. मुख्यमंत्री पद कोणाला यावरुन भाजप शिवसेनेत सुरु असलेला कलगीतुरा आता थोडासा मवाळ होताना दिसत आहे. असे वातावरणं असताना शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापनेच्या हलचाली सुरु केल्याची चर्चा आहे. दरम्यान, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांशी फोन पे चर्चा केल्याची माहिती आहे. सत्ता स्थापनेचा तिढा सोडवण्याच्या कारणासाठी फोन पे चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.

राज्यात नक्की कोणाचं सरकार येईल यावर संभ्रम आहे. राज्यात 9 नोव्हेंबरला विधानसभा बरखास्त होणार आहे, त्याआधी नवे सरकार येणे गरजेचे आहे, अन्यथा राज्याची वाटचाल राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने सुरु होईल. मात्र राष्ट्रपती राजवटीचे षडयंत्र कोणी रचत असेल तर हा महाराष्ट्रावर अन्यायकारक असेल असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले. राज्यातील राजकीय वातावरण तापत असताना केंद्राकडून हा प्रश्न राज्य स्तरावर सोडवावा असे सांगण्यात आले आहे.

तर आज काँग्रेसचे चाणक्य अशी ओळख असलेले अहमद पटेल आणि भाजप खासदार नितीन गडकरी यांची भेट झाली. त्या दरम्यान मुंबईत संजय राऊत यांनी देखील शरद पवारांची भेट घेतली. शिवसेनेबरोबर जाण्यास राष्ट्रवादी काँग्रेस तयार असली तरी काँग्रेसने अद्याप यावर कोणतीही स्पष्ट भूमिका मांडली नाही. त्यामुळे राज्यातील सत्ता स्थापनेवर अजून ही तिढा कायम आहे. काँग्रेसच्या हायकमांडकडून काही स्पष्टता आली नसली तरी राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांचा एक गट शिवसेनेसोबत जाण्यास तयार आहे अशी चर्चा आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांचा प्रयत्न आहे. काँग्रेस कार्याध्यक्षा यशोमती ठाकूर यांनी देखील शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे येत्या काळात काँग्रेस हायकमांड काय भूमिका घेते यावर बरेच काही आधारित आहे.

राज्यातील ओला दुष्काळ यावर आधारित मंत्रिमंडळाची बैठक सह्याद्रीच्या अतिथीगृहावर पार पडत आहे. यात सर्व जिल्ह्याचे पालक मंत्री उपस्थित असणार आहेत. यात शिवसेनेचे मंत्री उपस्थित आहेत. राज्यातील भाजप शिवसेनेतील मुख्यमंत्रिपदावरुन सुरु असलेला तिढा सुटत नसल्याने राज्यातील सत्तापेच वाढत चालला आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात फोनवरुन झालेल्या चर्चेत काय झाले याची देखील माहिती लवकरच समोर येईल.

Visit : Policenama.com