2 शहरांना जोडणारी पहिली इलेक्ट्रिक बस सेवा पुरवण्याचा मान ST महामंडळाला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे आणि मुंबई दोन शहरांना जोडणारी पहिली इलेक्ट्रिक बसची सेवा पुरवण्याचा मान एसटी महामंडळाने मिळवला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून प्रवाशांसाठी पहिली इलेक्ट्रिक बस सेवा देण्यात येणार आहे. इलेक्ट्रिकवर चालणारी पहिली बस मुंबईत दाखल झाली आहे. ही बस दादर ते पुणे दरम्यान धावणार आहे. या बसचा लोकार्पण सोहळा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबई सेंट्रल एसटी डेपोमध्ये पार पडला. या इलेक्ट्रिक बसचे नाव ‘शिवाई’ असे ठेवण्यात आले आहे.

इंधन दरवाढीमुळे होणारा खर्च टाळण्यासाठी विजेवर चालणारी बस घेण्याचा निर्णय एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी घेतला होता. त्यानुसार ही बस घेण्यात आली आहे. विजेवर चालणाऱ्या अशा एकूण 150 बसेस खरेदी करण्यात येणार असून त्याची निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे.

बसची वैशिष्ट्ये –
या बसमध्ये सीसीटीव्ही, व्हिटीएस, आरामदायी आसने, प्रवाशांशी संपर्क साधण्यासाठी उद्घोषणा यंत्रणा अशा सुविधा उपलब्ध आहेत. आसन क्षमता 44 इतकी असेल. ही बस वातानुकुलीत असून चार्ज केल्यानंतर 300 किमीपर्यंतचा पल्ला गाठण्याची क्षमता या बसची आहे.

शिवाय बस चार्ज होण्यासाठी 1 ते 5 तासांचा कालावधी लागणार आहे. या बसचा खर्च शिवशाही बसपेक्षा अधिक आणि शिवनेरीपेक्षा कमी असणार असून या इलेक्ट्रिक बसमुळे प्रदुषणात घट होणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त