पवारांच्या खेळीनंतर भाजप ‘एकाकी’ ? सत्तेतील वाटेकरी ‘शिवसेने’सह प्रादेशिक पक्ष पवारांच्या ‘समर्थनार्थ’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील विधानसभा तोंडावर असताना अचानक राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. त्याला कारण ठरले ते शरद पवार आणि ईडी प्रकरण. यानंतर काँग्रेससह शिवसेना, वंचित आघाडी, मनसे सर्वच्या सर्व शरद पवारांच्या समर्थनार्थ उतरले. त्यामुळे सत्ताधारी भाजप मात्र एकटे पडले. विशेष म्हणजे सत्तेतील शिवसेनेने भाजपला साथ देण्याऐवजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना समर्थन दिले.

एकीकडे शरद पवारांच्या दौऱ्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आणि प्रादेशिक पक्ष एकत्र आले. त्यानंतर आता भाजप एकाकी पडला आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला. त्यामुळे भाजपसमोर नवे आव्हान उभे राहिल्याची चर्चा सुरू झाली आहे.

आज ईडीच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय मी तहकूब करतो असे शरद पवार यांनी सांगितले. ईडीच्या बॅकफूटनंतर शरद पवार यांनी सांगितले की मी जबाबदार माणूस आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो त्यामुळे मी हा निर्णय घेतला आहे. कारण मी महाराष्ट्रतील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्न पाहिला आहे. परंतू सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ ईडीच्या कार्यालयात जाऊ शकते.

ईडी बॅकफूटवर
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सक्तवसुली संचलनालयात जाण्याचा चंग बांधून बसले होते. मात्र खुद्द ईडीलाच बॅकफूटवर यावे लागले होते. ईडीने शरद पवारांना मेल करुन तूर्तास चौकशीची गरज नाही असे सांगितले होते. शिखर बँकेत गैरव्यवहार प्रकरणी त्यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर शरद पवार स्वत: ईडीच्या कार्यालयात जाणार होते. दुपारी 1 वाजता शरद पवार ईडीची कार्यालयात हजर राहणार होते, तसा मेल करत शरद पवार यांनी आपल्या वकिलांच्या माध्यमातून ईडीच्या कार्यालयाला कळवले होते.