…तर भाजप लंडन, अमेरिकेतही ‘कमळ’ फुलवेल : शिवसेना  

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी लोकसभेसाठी शिवसेना-भाजप युती होणार की नाही, हे नक्की नाही. मात्र शिवसेना भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं भाजपवर निशाणा साधला आहे. तसंच मागील लोकसभा निवडणुकीत ४२ जागा जिंकल्या होत्या. यावेळी आम्ही कोणत्याही परिस्थित ४३ जागा जिंकू, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्याचा शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखाच्या माध्यमातून समाचार घेतला आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आत्मबलाचे कौतुक करावे तेवढे थोडेच. महाराष्ट्रात ४८ पैकी ४३ जागा जिंकण्याचा तोडगा यांच्यापाशी आहे. फडणवीस यांचा दावा आहे की, यावेळी आम्ही बारामतीत पवारांचा पराभव करू. यावर पवारांनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे भाजपास शुभेच्छा दिल्या आहेत. खरे तर महाराष्ट्रातील पैकीच्या पैकी म्हणजे ४८ जागा हे लोकं सहज जिंकू शकतात आणि देशात स्वबळावर ५४८ जागा कुठेच गेल्या नाहीत. ‘ईव्हीएम’ आणि असा हा फसफसणारा आत्मविश्वास सोबतीला असताना लंडन, अमेरिकेतही ‘कमळ’ फुलू शकेल, पण त्याआधी अयोध्येत राममंदिराचे कमळ का फुलले नाही? याचे उत्तर द्या. अशा अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडे नाहीत, असा घणाघात अग्रलेखात केला आहे.

‘‘याला पाडू, त्याला पाडू, त्याला गाडू’’ वगैरे भाषा सध्या दिल्लीपासून गल्लीपर्यंत सुरू आहेत. राज्यकर्त्या पक्षात जो संयम, विनम्र भाव असायला हवा तो अलीकडच्या काळात नष्ट झाला आहे. एक प्रकारची राजकीय बधिरता निर्माण झाली आहे. विरोधी पक्ष बेलगाम बोलतो हे मान्य, पण म्हणून सत्ताधारी पक्षानेही असे बेलगाम बोलू नये, असंही अग्रलेखात शिवसेनेनं म्हटलं आहे.

ज्याप्रमाणे महाराष्ट्रात थंडीच्या लाटेने पिकांवर बर्फाचा थर साचला आहे. अनेक भागात दवबिंदू गोठले आहेत. त्याप्रमाणे सत्ताधार्‍यांची बुद्धीच थंडीने गोठली व राजकारण बिघडले असे काही झाले आहे काय ? शेतकरी आज संकटात आहे. दुष्काळग्रस्त महाराष्ट्राच्या तोंडास केंद्राने पाने पुसली. त्यावर जोरात बोलायचे सोडून ‘‘याला पाडा, त्याला गाडा’’ हेच पालुपद सुरू आहे, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.

सत्ता कोणाला नको आहे ? राजकारण करणार्‍या सगळ्यांनाच ती हवी आहे, पण चोवीस तास त्याच नशेत राहून झिंगणे व झिंगल्यासारखे तर्राट बोलणे हे बरे नाही. महाराष्ट्रातील अनेक प्रश्नांवर या सरकारकडे तोडगा नाही. परंतू महाराष्ट्रात ४८ पैकी ४३ जागा जिंकण्याचा ‘तोडगा’ यांच्यापाशी आहे. जनता मरू द्या, राज्य खाक होऊ द्या, पण राजकारण टिकले पाहिजे. याला पाडू, त्याला पाडू असे सध्या सुरू आहे. याच धुंदीत उद्या हे स्वतःच कोसळतील, तरीही यांचा गिरे तो भी टांग उपर या पद्धतीने कारभार सुरूच राहील. थंडीने दवबिंदू गोठतात तसे राजकीय अतिसाराने सत्ताधार्‍यांची बुद्धी व मन गोठले आहे, असंही शिवसनेनं अग्रलेखात म्हटलं आहे.