शिवसेनेचा सामनामधून भाजपला इशारा; म्हणाले – ‘सांगली, जळगावातील करेक्ट कार्यक्रम ही तर नांदी, यापुढे असे अनेक कार्यक्रम होतील’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  सांगली आणि जळगाव महानगरपालिकेची सत्ता भाजपच्या हातातून निसटल्यावर यावरून करेक्ट कार्यक्रमाची चर्चा राज्यभर रंगली. तर यावरूनच आता शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे. तर भाजपला एक इशारा देत, सांगली- जळगावातील करेक्ट कार्यक्रम ही तर नांदी आहे. यापुढे असे अनेक कार्यक्रम होतील, असा थेट इशारा शिवसेनेने भाजपला लगावला आहे.

तर, दोन्ही जिल्ह्यात सत्ता परिवर्तन झालं याला फार मोठे नैतिक अधिष्ठान नसले तरी नैतिक किंवा अनैतिक यावर बोलण्याचा अधिकार आता भाजपने गमावला आहे. जळगावात भाजप नेत्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत, असे एकनाथ खडसे यांनी आता सांगितले. मग सध्या जे सत्तांतर घडवून आणले त्यानुसार ही सर्व आश्वासने पूर्ण करा. सत्तापालट कारणी लागो. तरच करेक्ट कार्यक्रम सत्कारणी लागला असे म्हणता येईल. तसेच सांगलीत जयंत पाटील यांनी भाजपचा करेक्ट कार्यक्रम केला. तेथील महापालिकेतील भाजपची सत्ता उलथवून राष्ट्रवादीचा महापौर केला. हा कार्यक्रम करेक्ट व्हावा यासाठी भाजपच्या १७ नगरसेवकांनी वाऱ्याची दिशा पाहून मतदान केले. असे शिवसेनेने सामनामधून म्हटले आहे.

तसेच, जळगाव महानगरपालिकेतही करेक्ट कार्यक्रम झाला असून भाजपच्या २७ नगरसेवकांनी वाऱ्याची दिशा ओळखून शिवसेनेचा महापौर व्हावा यासाठी मतदान केले. जळगावात महापौर आणि उपमहापौर शिवसेनेचाच झाला. त्यामुळे उत्तर महाराष्ट्राचे स्वयंभू बादशहा गिरीश महाजन यांना जोरदार धक्का बसला आहे, असा टोला शिवसेनेने लगावला आहे. तसेच जळगाव भाजपचा बालेकिल्ला कधीच नव्हता. महापालिका निवडणुकीत महाजन यांनी पालिकेत भाजपची सत्ता आणली. महाजन यांचा कारभार एकतंत्री व अहंकारी होता. त्यामुळेच भाजप नगरसेवक कंटाळले होते. गिरीश महाजन यांचा अहंकार इतक्या टोकाचा की आपल्यात संपूर्ण क्षमता आहे, पक्षाने जबाबदारी दिली तर बारामतीतही विजय मिळवून दाखवतो, अशी भाषा ते करु लागले. इतरांना तुच्छ लेखण्याचा त्यांचा स्वभावच जळगावात भाजपला घेऊन बुडाला आहे, अशा शब्दांत शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून टीका केली आहे.

दरम्यान, खडसे यांनी त्यांच्या राजकारणाची, तसेच जळगाववरील वर्चस्वाची चुणूक दाखवली आहे. भाजप पक्षाचा फुगा एकापाठोपाठ एक फुटू लागला आहे. राज्यात भाजपला तात्पुरती सूज मधल्या काळात आली होती. ही सूज म्हणजे पक्षाची वाढ आहे असा गैरसमज काही मंडळीनी करुन घेतला. त्यातून अहंकाराचे वारे भाजप नेत्यांच्या कानात शिरले. त्या अहंकाराचा पाडावा जळगावात झाला. खडसे व महाजन यांच्यात राजकीय तेढ आहे. खडसे यांनी भाजप सोडला त्यामागची जी कारणे आहेत त्यातले प्रमुख कारण गिरीश महाजन हे एक आहेच, असे शिवसेनेने सामनामधून टीकास्त्र सोडले आहे.