एक बेडूक आणि त्याची दोन पोरं ; उद्धव ठाकरेंचा नारायण राणेंवर ‘हल्लाबोल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या आजच्या ऑनलाइन दसरा मेळाव्यात भाजपावर जोरदार हल्लोबोल केला. नरेंद्र मोदी तसेच राज्यातील भाजपा नेत्यांचा अतिशय तिखट शब्दात ठाकरे यांनी समाचार घेतला. यामध्ये त्यांनी शिवसेनेवर सातत्याने टीका करणारे भाजपा नेते नारायण राणे आणि त्यांच्या दोन मुलांवरही नाव न घेता हल्लोबोल केला. ठाकरे यांनी नारायण राणे यांची तुलना बेडकाशी तर त्यांच्या मुलांची तुलना बेडकाच्या पिलांशी केली आहे. ठाकरे यांनी केलेल्या या चौफेर घणाघातावर आता जोरदार राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

कोरोनामुळे यावर्षी शिवसेनेचा प्रसिद्ध दसरा मेळावा शिवाजी पार्क ऐजवी अवघ्या पन्नास मान्यवरांच्या उपस्थितीत सावरकर सभागृहात घेण्यात आला. या ऑनलाइन मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर ठाकरे शैलीत शरसंधान केले.

आपल्या घणाघती भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले, सध्या कोरोना जोरात आहे. बिहारमध्ये मोफत लस देणार आहेत. काही जणांना इंजेक्शन द्यावे लागते. तर काही जणांना माणसाचे नव्हे, तर गुरांचे इंजेक्शन द्यावे लागते. काही जण तर अशी बेडक आहेत. तुम्हाला माहिती आहे, एक बेडूक आणि त्याची दोन पोरं. या पक्षातून त्या पक्षात. या बेडकाच्या पिल्लांनी वाघ पाहिला. त्यांनी बाबांना सांगितले. बाप आवाज काढतोय पण, आवाज काही येत नाही, अशी बोचरी टीका ठाकरे यांनी नारायण राणे यांचे नाव न घेता केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मंदिरे खुले करण्याच्या मागणीवरून सुनावणारे राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचाही समाचार दसरा मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी घेतला. कोश्यारी याचे नाव न घेता ठाकरे म्हणाले, काळी टोपी घालणार्‍यांनी सरसंघचालक हिंदुत्वाबाबत काय म्हणतात ते समजून घ्यावे.

You might also like