शिवसेनेच्या आग्रही मागणीने हडपसर विधानसभा मतदारसंघात ‘चुरस’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणूक जाहीर झाली नसली तरीही सध्याच्या राजकीय हालचाली पाहता विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याचे चित्र दिसून येत आहे. पुणे शहरातही हे चित्र पाहायला मिळत असून विशेषतः हडपसर, कसबा आणि शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात इच्छुकांमध्ये आतापासूनच चुरस निर्माण झाली आहे. विशेषत: हडपसरमध्ये शिवसेनेच्या इच्छुकांनी एकत्रित पत्रकार परिषद घेवून हा मतदारसंघ युतीत शिवसेनेसाठी राखीव ठेवण्याची मागणी केल्याने येथे मोठी चुरस निर्माण झाली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीचे रणांगण कसे असणार, हे शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होणार की नाही, यावर अवलंबून असणार आहे. मात्र, सध्याच्या घडीला आघाडी विरुद्ध युती अशीच निवडणूक होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे आमदार असल्याने शिवसेना-भाजपची युती झाल्यास शिवसेनेच्या पदरात दोन मतदारसंघ पडतील असे, सूतोवाच संबंधित पक्षांच्या नेतृत्वाकडून दिले गेले आहेत. त्यातही हडपसर आणि वडगाव शेरी हे दोन मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात येतील, अशी चर्चा आहे. त्यामुळे या मतदारसंघांमध्ये शिवसेनेच्या इच्छुकांकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे.

हडपसरमधील शिवसेनेचा विचार केल्यास हा मतदारसंघ तसा शिवसेनेचा पारंपारिक मतदारसंघ आहे. पूर्वीच्या कॅंटोनमेंट मतदारसंघाचा बराचसा भाग या हडपसर मतदार संघात समाविष्ट आहे. कै. सूर्यकांत लोणकर यांच्यापासून हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. मधल्या काही काळात काँग्रेसने देखील ही जागा जिंकली होती. मात्र, शिवसेनेचा पारंपरिक मतदार याठिकाणी टिकून असल्याचे गेल्या सलग तीन लोकसभा निवडणुकीतही दिसून आले आहे.

हडपसर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून इच्छुक असलेल्यांपैकी प्रमोद (नाना) भानगिरे हे एक महत्त्वाचे नाव समजले जाते. पुणे महापालिकेत तिसऱ्यांदा शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले भानगिरे यांनी विधानसभेसाठी यंदा जोरदार तयारी सुरू केल्याची चर्चा मतदारसंघात आहे. ‘शिवरायांचा मावळा, आमदार हडपसरचा’, असे फ्लेक्स हडपसरमध्ये लागले आहेत. त्यांनी त्यांच्या प्रभागात केलेली विकास कामे, तगडा जनसंपर्क आणि नातीगोती यांच्या जोरावर भानगिरे हे हडपसरचा गड सर करण्यासाठी सज्ज असल्याचे दिसून येते. मात्र, दुसरीकडे एकाच विधानसभा मतदारसंघात तुपे, घुले, भोसले अशी बलाढ्य घराणी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात किंवा काँग्रेसच्या इच्छुकांकडून फारशी तयारी होताना दिसत नाही. त्यामुळे या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.