ओवेसींची शिवसेनेवर बोचरी टीका, म्हणाले – ‘भांगडा राजकारण सुरू’

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – असद्दुद्दीन ओवेसी यांनी आता शिवसेनेला चांगलेच धारेवर धरले आहे. त्यांनी शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन (CAB) शिवसेनेचे भांगडा राजकारण सुरु आहे असे एआयएमआयएमचे खासदार असद्दुद्दीन ओवेसी म्हटले आहेत. तसेच ते म्हणाले की, शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत हातमिळवणी करून सत्ता स्थापन केली तेव्हा सेनेने सेक्युलर हा शब्द त्यांच्या किमान समान कार्यक्रमात लिहिला आहे. मात्र हे बिल धर्मनिरपेक्षतेविरोधात आहे आणि हे शिवसेनेला देखील चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळेच या विधेयकावरुन शिवसेनेचे ‘भांगडा पॉलिटिक्स’ सुरु आहे अशी खोचक टीका केली आहे.

नागरिकत्व सुधारणा विधेयक हे सोमवारी लोकसभेत बहुमताने मंजूर झाले. या विधेयकास शिवसेनेनेही पाठींबा दर्शविला आहे. त्यामुळे शिवसेनेला टीकेला सामोरे जावे लागले. काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई हे देखील शिवसेनेच्या या निर्णयावर नाराज होते. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी यावर स्पष्टीकरण देत सांगितले की, जर एखादे विधेयक हे देशहिताच्या बाजूने झुकणारे असेल तर त्या वेळेस पाठिंबा हा दर्शविला पाहिजे. म्हणूनच नागरिकत्व सुधारणा विधेयक देशहिताचं असल्यानं शिवसेनेनं या विधेयकास पाठींबा दिला असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं होतं. तसेच हे विधेयक बाळासाहेब ठाकरेंच्या राष्ट्रीयत्वाला धरुन आहे त्यामुळे पाठिंबा दिला असंही ते म्हटले. “राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करताना किमान समान कार्यक्रम निश्चित करण्यात आला. हा कार्यक्रम विचारधारांसाठी तयार केलेला कार्यक्रम आहे. मात्र, नागरिकत्व सुधारणा विधेयक हे महाराष्ट्राच्या नव्हे तर देशहितासाठी आणण्यात आलं आहे.” असे सावंत यांनी स्पष्टीकरण दिले.

दरम्यान असद्दुद्दीन ओवेसी यांच्या या टीकेला उद्धव ठाकरे काय उत्तर देतात हे पाहणे रोचक ठरणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील स्पष्ट भूमिका घेत सांगितले होते की, आम्हाला कोणी काय करायचं ते शिकवू नये, नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाबाबत जोवर स्पष्टता येणार नाही, तोवर त्याला पाठिंबा देणार नाही. असे त्यांनी स्पष्ट केले होते. परंतु आता ओवेसींनी शिवसेनेचे राजकारण हे संधीसाधू आहे असे म्हणत उद्धव ठाकरेंना डिवचले आहे. त्यांच्या या बोचऱ्या टीकेला शिवसेना काय पलटवार करते हे समजेलच.

Visit : Policenama.com