रामदास कदमांकडून जादूटोण्यासाठी ‘बंगाली बाबां’चा वापर

दापोली : पोलीसनामा ऑनलाईन – राज्याचे पर्यावरण मंत्री तसेच शिवसेना नेते रामदास कदम यांच्यावर त्यांच्याच पक्षाच्या एका नेत्याने गंभीर आरोप केला आहे. दापोली विधानसभा मतदासंघातील शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी रामदास कदम हे ‘जादूटोणावाले’ असल्याचा गंभीर आरोप केला आहे. रामदास कदम हे बंगाली बाबांना घेऊन फिरत असतात, असाही त्यांनी कदम यांच्यावर आरोप केला. महत्वाचे म्हणजे विरोधी पक्षनेता होण्यासाठी रामदास कदम हे प्रत्येक अमावस्येला भगतगिरी करत असत. असेही ते म्हणाले.

‘जादूटोण्यावरून’ शिवसेना नेत्यांमधले वाद चव्हाट्यावर
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात वातावरण चांगलेच तापले आहे. वेगवेगळ्या पक्षांमध्ये विविध वाद होताना दिसत आहेत. परंतु, शिवसेना पक्षामध्येच त्यांच्या नेत्यांमध्ये वाद सुरु असल्याचे आता चव्हाट्यावर आले आहे. ‘रामदास कदम यांनी दापोली विधानसभा मतदारसंघात घुसखोरी करू नये, ज्या मतदारसंघात त्यांचा पराभव झाला त्या मतदार संघातून निवडणूक लढवावी माझ्या मतदार संघात मी आमदार नसलो तरी चालेल पण या मतदारसंघातला आणि पक्षासाठी त्याचं योगदान आहे असा कोणीही उमेदवार चालेल,’ असं सूर्यकांत दळवी म्हणाले.

निलेश राणेंची ट्विटर वरून टीका
शिवसेनेच्याच एका माजी आमदाराने पर्यावरणमंत्री कदम यांच्यावर हल्लाबोल केल्यानंतर माजी खासदार निलेश राणे यांनीही शिवसेनेवर बोलल्यावाचून कसे काय राहतील. ते म्हणाले ‘फक्त रामदास कदम नाही, तर शिवसेनेचे आमदार, सदानंद चव्हाण, उदय सामंत यांचे पण हेच धंदे चालू आहेत. यातील प्रत्येकाकडे भगत गँग आहेत, जे दिवस रात्र उलट सुलट उद्योग करण्यात मग्न असतात. यामुळेच महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्हा विकासापासून वंचित राहिला आहे. तसेच तो विकासाच्या यादीत २३ व्या क्रमांकावर वर गेला आहे. अशी टीका ट्विटरवरून एक ट्विट करत निलेश राणे यांनी केली आहे.

महाराष्ट्रला पुरोगामी महाराष्ट्र असं म्हटले जाते. इथे मोठ्या राजकीय पक्षाचे नेते एकमेकांवर जादूटोणा, बुवाबाजीचे आरोप- प्रत्यारोप करताना दिसत आहेत.

You might also like