ममता बॅनर्जींच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची उडी, शिवसेनेकडून प. बंगला निवडणूक लढविण्याची घोषणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणूक शिवसेना लढविणार असल्याची माहिती शिवसेना (Shivsena) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन दिली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत पश्चिम बंगाल निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली. त्यावेळी शिवसेनेने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली.

पश्चिम बंगालमधल्या निवडणुकीला अद्यापही काही काळ शिल्लक आहे. मात्र, आतापासून राजकीय पक्षांनी या निवडणुकीची मोर्चे बांधणी सुरु केली आहे. भाजप, तृणमूल काँग्रेस, डावे पक्ष आणि काँग्रेस बरोबरच ओवेसींची पार्टी AIMIM देखील निवडणुका लढवणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेनेही पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लढवण्याच निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदा पश्चिम बंगालच्या निवडणुकीत वेगळच रंगत येणार आहे.

शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पश्चिम बंगालमध्ये होणारी विधानसभा निवडणूक शिवसेना लढवणार असल्याचे सांगितले असले तरी नेमक्या किती जांगावर उमेदवार उभे करणार हे त्यांनी सांगितले नाही. त्यामुळे शिवसेना पश्चिम बंगालमध्ये किती जागा लढवणार हे येत्या काळात समजले.

दरम्यान, एका इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, पश्चिम बंगालच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पश्चिम बंगालचा दौरा करु शकतात. शिवसेना कोलकता, हुगळी, दमदमसह अनेक भागांत आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवू शकते.