भेकराईनगरमधील व्याधीग्रस्त काकांना शिवसैनिकांची मदत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  – फुरूसुंगी (भेकराईनगर) मधील 56 वर्षीय ज्येष्ठ काका शारीरिक व्याधीने त्रस्त आहेत. कोरोनाचा विषाणू रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन आहे. त्यामुळे घराबाहेरही पडता येत नाही, अशी त्यांची अवस्था झाली आहे. त्यामुळे त्यांनी मित्रांच्या मदतीने सोशल मीडियावर मदतीचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शिवसैनिकांनी तातडीने मदतीचा हात पुढे केला.

दीपक तांबोळी (वय 56, रा. भेकराईनगर, फुरसुंगी, ता. हवेली) असे काकांचे नाव आहे. दरम्यान, माझ्याकडे पैसे नाहीत, मी व्याधीने हतबल झालो आहे, त्यामुळे आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचे पत्र सोशल मीडियावर टाकले. सोशल मीडियावरील संदेश पाहून फुरसुंगीतील शिवछत्रपती पुरस्कारविजेते रुपेश मोरे, युवासेनेचे शादाब मुलाणी, निलेश पवार, मयुर शिंदे, पंकज भारती यांनी त्यांचा शोध घेऊन मदत केली. तांबोळी कुटुंबीयाचे समुपदेशन करून सर्व जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांना सध्या एक महिन्याची औषधे आणि धान्य दिले असून, भविष्यातही त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले.