महिला दिनाबद्दल बोलायला उभे राहिले आदित्य ठाकरे, माजी मुख्यमंत्री फडणवीसांना लगावला टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेत झालेल्या चर्चेदरम्यान भाषण केलं. त्यांनी आपल्या भाषणात महिलांचे प्रश्न आणि समाजाचा दृष्टीकोन याबद्दल भाष्य केलं. तसेच त्यांनी आपल्या भाषणादरम्यान विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला देखील लगावला आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘पुरुषांनी महिलांना स्व-संरक्षणाचे धडे शिकवले पाहिजे कारण महिला सुरक्षित राहण्यासाठी पुरुषांवर देखील जबाबदारी आहे. तसेच शाळेत जेंडर इक्वॅलिटी चे धडे शिकवले पाहिजे. लोकांचे मन साफ आणि शुद्ध झालं पाहिजे. प्रत्येकाने आपल्यात बिंबवलं पाहिजे की महिला या कमकुवत नाही, जे पुरुष करू शकतात ते महिलाही करू शकतात. विशेष म्हणजे जेथे महिला पोलीस अधिकारी असतात तिथे कायदा सुव्यवस्था चांगली असते. मला कुणाकडे बोट दाखवायचे नाही, परंतु पब्लिक डिसकोर्स बदलला पाहिजे,’ असे आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केले.

आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना लगावला टोला
देवेंद्र फडणवीसांनी एका मुद्द्यावरून शिवसेनेला धारेवर धरत टीका केली होती की शिवसेनेने बांगड्या घातल्या असतील, आम्ही नाही. त्यांच्या या टीकेवर आदित्य ठाकरे म्हणाले होते की फडणवीसांनी महिलांचा अपमान केला असून त्यांनी माफी मागायला हवी. त्यानंतर आता पुन्हा त्याच मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंनी फडणवीसांना टोला लगावला आहे. ते म्हणाले की ‘हातात बांगडी घातली का हे बोललं जातं. झाशीची राणी बांगड्या घालून युद्ध लढली,’ असं म्हणत त्यांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला.

आदित्य ठाकरे यांच्या भाषणातील काही महत्त्वाचे मुद्दे :
एखादी घटना कशी घडणार नाही, हा विचार सर्वांनी केला पाहिजे.

घरात आणि शाळेत संस्कार स्त्री करत असते.

आपण मुलांना ‘Right Touch Wrong Touch’ शिकवलं पाहिजे.

स्त्रीने कसे कपडे घातले, किती वाजता बाहेर गेली याबद्दलच चर्चा जास्त होते.

महिला अत्याचार झाले की स्त्रीला प्रश्न विचारले जातात, पण पुरुषांना कुणीच प्रश्न विचारत नाही.

आपल्या शिव्या देखील आई बहिणीच्या नावाने आहेत. वडील किंवा भावाच्या नावाने नाही.