शिवसेना उपनेते अनिल राठोड यांचा नगरच्या ‘सबजेल’ला मुक्काम ?

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – शहर अभियंत्यांवर बूट फेकल्याच्या प्रकरणात हजर झाल्यानंतर पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केलेल्या अनिल राठोड यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. त्यानंतर जामिनासाठी अर्ज केला असता न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे राठोड यांना ‘सबजेल’ मध्ये हलविले जाणार आहे.

बोल्हेगाव येथील रस्त्याच्या कामावरून झालेल्या आंदोलनावेळी शिवसैनिकांनी प्रभारी शहर अभियंता विलास सोनटक्के यांच्यावर महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्यासनोर बूट फेकून मारला होता. यावेळी अधिकाऱ्यांवर खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी राठोड यांनी चिथावणी दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. राठोड यांनी अधिकाऱ्यावर खोट्या गुन्हा दाखल करण्याची चिथावणी दिल्याने त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्याची मागणी पोलिसांनी न्यायालयात केली होती. जिल्हा न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर राठोड यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.

परंतु, परिस्थितीचा अंदाज घेऊन राठोड यांनी अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतला होता. पोलीस दफ्तरी फरार असताना राठोड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. न्यायालयाने जामीन फेटाळलेला आरोपी फरार असताना खुलेआम फिरत होता. मुख्यमंत्र्यांना भेटत होता. तरी त्याला अटक केली जात नव्हती. याबाबत ‘पोलीसनामा’ ने वृत्त प्रसारित केले होते. अखेर वाढत्या दबावापुढे राठोड यांनी पोलिसांत हजर होण्याचा निर्णय घेतला. आज दुपारी शिवसेना उपनेते माजी मंत्री अनिल राठोड हे स्वतःहून तोफखाना पोलिस ठाण्यात हजर झाले. तोफखाना पोलिसांनी अटकेची प्रक्रिया पूर्ण करून राठोड यांना मुख्य न्यायदंडाधिकारी चांदगुडे यांच्यासमोर हजर केले आहे. पोलिसांनी न्यायालयाकडे आरोपी राठोड याला सखोल तपासासाठी पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी केली. आरोपीचे वकील ॲडव्होकेट विश्वासराव आठरे पाटील यांनी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची आवश्यकता नसल्याचा बचाव केला. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने राठोड यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.

न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर राठोड यांच्यावतीने न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर जामिनासाठी अर्ज करण्यात आला. सरकारी वकील पी. ए. कुलकर्णी यांनी सदर जामिनावर हरकत घेतली. या गुन्ह्याचा तपास होणे बाकी आहे. तसेच दाखल गुन्ह्याची सुनावणी सत्र न्यायालयात होत असल्याने या न्यायालयाला जामीन देण्याचा अधिकार नसल्याचा युक्तिवाद केला. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने राठोड यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे राठोड यांना आता जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घ्यावी लागणार आहे. जामीन अर्ज फेटाळल्यामुळे राठोड यांना ‘सबजेल’मध्ये हलवले जाणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –