अहमदनगर : शिवसेना उपनेते राठोड यांना जामीन मंजूर

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – महापालिकेचे शहर अभियंता विलास सोनटक्के यांच्यावर बूट भिरकाविल्याच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेले आरोपी शिवसेना उपनेते अनिल राठोड यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 25 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्‍यावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.

बोल्हेगाव येथील रस्त्याच्या कामावरून झालेल्या आंदोलनावेळी शिवसैनिकांनी प्रभारी शहर अभियंता विलास सोनटक्के यांच्यावर महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्यासमोर बूट फेकून मारला होता. यावेळी अधिकाऱ्यांवर खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी राठोड यांनी चिथावणी दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. राठोड यांनी अधिकाऱ्यावर खोट्या गुन्हा दाखल करण्याची चिथावणी दिल्याने त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्याची मागणी पोलिसांनी न्यायालयात केली होती. जिल्हा न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर राठोड यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. परंतु, परिस्थितीचा अंदाज घेऊन राठोड यांनी अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतला होता. पोलीस दफ्तरी फरार असताना राठोड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.

न्यायालयाने जामीन फेटाळलेला आरोपी फरार असताना खुलेआम फिरत होता. मुख्यमंत्र्यांना भेटत होता. तरी त्याला अटक केली जात नव्हती. याबाबत ‘पोलीसनामा’ ने वृत्त प्रसारित केले होते. अखेर वाढत्या वाढत्या दबावापुढे राठोड यांनी पोलिसांत हजर होण्याचा निर्णय घेतला. शिवसेना उपनेते माजी मंत्री अनिल राठोड हे स्वतःहून तोफखाना पोलिस ठाण्यात हजर झाले. तोफखाना पोलिसांनी अटकेची प्रक्रिया पूर्ण करून राठोड यांना मुख्य न्यायदंडाधिकारी चांदगुडे यांच्यासमोर हजर केले. पोलिसांनी न्यायालयाकडे आरोपी राठोड याला सखोल तपासासाठी पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी केली.

आरोपीचे वकील ॲडव्होकेट विश्वासराव आठरे पाटील यांनी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची आवश्यकता नसल्याचा बचाव केला. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने राठोड यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी जामीन फेटाळल्यानंतर राठोड यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली होती. जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. 25 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्‍यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

आरोग्यविषयक वृत्त