शिवसेनेच्या ‘या’ उपनेत्यावर पोलीसांकडून तडीपारीचा प्रस्ताव

अहमदनगर: पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेनेचे उपनेते व माजी आमदार अनिल राठोड यांना तडीपार करण्यात यावे, असा प्रस्ताव पोलिसांनी तयार केला आहे. त्या प्रस्तावावर आज दुपारी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यासमोर सुनावणी झाली. राठोड यांच्यामुळे शहरीत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे शहराची शांतता धोक्यात आली, असे पोलिसांनी सादर केलेल्या प्रस्तावात म्हटले आहे.

शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्यावर पोलिसांवर दगडफेक, सरकारी कामात अडथळा आणण्यासह अनेक गुन्हे दाखल आहेत. राठोड यांच्यामुळे शहरात अनेक वेळेस कायदा-सुव्यवस्था निर्माण झाली, असा आरोप पोलिस प्रशासनाचा आहे. त्यामुळे माजी आमदार राठोड यांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात यावे, असा प्रस्ताव पोलिस प्रशासनाच्यावतीने तयार करण्यात आला आहे. पोलिसांनी सदरचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांताधिकारी उज्वला गाडेकर यांच्याकडे सादर केला आहे. सदरचा प्रस्ताव चौकशीसाठी गाडेकर यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्याकडे पाठविला आहे. सदर प्रस्तावावर म्हणणे सादर करण्यासाठी मिटके यांनी माजी आमदार राठोड यांना नोटीस पाठवली होती. त्यावर म्हणणे सादर करण्यासाठी राठोड हे आज दुपारी पोलीस अधीक्षक कार्यालयातील उपविभागीय पोलिस अधिकारी मिटके यांच्या दालनात म्हणणे सादर करण्यासाठी हजर झाले होते. सदर प्रस्तावाची चौकशी पूर्ण झाल्यानंतर अभिप्रायासह प्रांताधिकार्‍यांकडे अहवाल सादर केला जाईल. त्यानंतर अंतिम कार्यवाही केली जाईल.

अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांना शहरबंदी करण्यात आली होती. मात्र, त्यातून माजी आमदार राठोड यांना दिलासा देण्यात आला होता. आता पोलिसांनी थेट त्यांच्या तडीपारीचाच प्रस्ताव तयार केला आहे. त्यावर कार्यवाहीची प्रक्रिया सुरू आहे. प्रांताधिकारी यावर अंतिम निर्णय काय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘आयएएस’ अधिकाऱ्याला केली होती अरेरावी
गणेशोत्सवात शहरातील रस्त्यावर मंडप टाकल्याप्रकरणी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी नायर यांनी नेताजी सुभाष चौकातील मंडप जमीनदोस्त केला होता. त्यावेळी माजी आमदार अनिल राठोड यांनी तेथे धाव घेऊन नायर यांच्याशी हुज्जत घालून अरेरावीची भाषा वापरली होती. राठोड यांनाही सदर अधिकाऱ्यांनी चांगलेच खडे बोल सुनावले होते. याबाबतचा ‘व्हिडिओ’ शहरात व्हायरल झाला होता.

दुष्काळग्रस्तांना दिलासा ! केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मोठी मदत जाहीर
अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी व्हायरल करणारा पोलीस ‘गाेत्यात’